स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' द्या:आमदार प्रसाद लाड यांची विधिमंडळात मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांचा सकारात्मक प्रतिसाद




स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी आज विधानपरिषदेत करण्यात आली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मकता दर्शवली असून, यासंदर्भातील ठराव लवकरच सभागृहात मांडण्यात येईल, असे संकेत संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. गेल्या १० वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात सावरकरांच्या विचारांचे अनुकरण करणारे सरकार असतानाही अद्याप हा सन्मान का मिळाला नाही, असा प्रश्न विविध संघटनांकडून वारंवार उपस्थित केला जातो. तर विरोधकांनी या मुद्द्यावरून वेळोवेळी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर झालेली चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. नेमके काय म्हणाले प्रसाद लाड? आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी असल्याने विधान परिषदेच्या सभागृहात त्यांच्या बलिदानाची आणि विचारांची आठवण करून देण्यात आली. विधानपरिषदेत बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की “आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणारे सरकार आज राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळावा, यासाठी आपण या सभागृहात एकमताने ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा.” चंद्रकांत पाटलांनी काय उत्तर दिले? आमदार प्रसाद लाड यांच्या मागणीला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मकता दर्शवली. “आम्ही यासंदर्भातील प्रस्ताव सभापती महोदयांकडे मांडू. शासनाला असा प्रस्ताव सभागृहात आणावा लागेल आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल,” असे पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे महाराष्ट्र विधिमंडळातून सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराबाबतच्या अधिकृत कार्यवाहीला आता सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. ‘भारतरत्न’साठी शिफारसीची तांत्रिक गरज नाही सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे, २०१९ च्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते की, भारतरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही औपचारिक शिफारसीची तांत्रिक गरज नसते. सरकार शिफारसीशिवायही हा पुरस्कार देण्यास सक्षम आहे. मात्र, जनभावना आणि विधिमंडळाचा ठराव म्हणून हा प्रस्ताव पुन्हा एकदा केंद्राच्या पटलावर मांडला जाणार आहे. सावरकरांमुळे पुरस्काराचेच महत्त्व वाढेल : सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अलीकडेच सावरकरांच्या भारतरत्नबाबत भाष्य केले होते. “सावरकरांना भारतरत्न मिळाल्यास त्या पुरस्काराचेच मोल आणि महत्त्व अधिक वाढेल,” असे उद्गार त्यांनी काढले होते. गेल्या १० वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असूनही अद्याप हा सन्मान का मिळाला नाही, असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारला जात होता. आता विधिमंडळातील या नव्या हालचालींमुळे हा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *