निवडणुका संपल्या तरी पक्षांतराचा धडाका:नांदेडसह संभाजीनगरमध्ये शिवसेनेत मोठे 'इनकमिंग', माजी आमदार शंकर अण्णा धोंडगेंचाही शिंदे सेनेत प्रवेश




राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ अद्यापही थांबलेली नसून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतरही पक्षांतराचे सत्र जोमाने सुरूच आहे. आज शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ पाहायला मिळाले, ज्यामध्ये नांदेडमधील एका माजी आमदारासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला. तसेच, छत्रपती संभाजीनगरमधील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करत भगवा हाती घेतला. त्यांच्यासोबत दत्ता आनंदराव पवार, नीलमताई खेमनर, शिवराज धोंडगे, गोविंदराव भवर, मनोहर पटवारी, लक्ष्मणराव वंजे, अनिल फंड, बबनराव गवारे, मंचकराव बचाटे, दिलीप धोंडगे, भैय्यासाहेब पाटील, मारुती जाधव आणि अनिल यादव यांसारख्या अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे मानले जात आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे हे आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम करणारे नेतृत्व आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी उभी केलेली संघटनात्मक ताकद मोठी आहे. अशा अनुभवी आणि लढाऊ नेतृत्वामुळे शिवसेनेची शेतकऱ्यांसंदर्भातील भूमिका आणखी मजबूत होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेने काँग्रेससह इतर पक्षांना मोठा धक्का दिला असून, अनेक बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भगवा हाती घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, उपसचिव तथा रेणुका साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब निर्मळ, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश डूमाले आणि माजी नगराध्यक्ष जतसिंह परदेशी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्यासोबतच अशोक जाधव, दत्तात्रय फसाटे, अप्पासाहेब मिसाळ, फिरोज पठाण आणि अन्सर सय्यद यांसारख्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जोर ग्रामीण भागातही पाहायला मिळाला, जिथे चौका गावचे माजी उपसरपंच अशोक वाघ यांच्यासह पुंडलिक पवार, शीतल लडके, शंकर बोंगाणे, लहानु वाघ आणि इतर स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. तसेच, वैजापूर तालुक्यातील सत्यजीत सोमवंशी, ऋतुराज सोमवंशी आणि सतीश शिंदे यांसारख्या तरुण व सक्रिय पदाधिकाऱ्यांनीही अधिकृतपणे शिवसेनेची वाट धरली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या ‘इनकमिंग’मुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *