[ads1]
लोकप्रतिनिधी राजकीय दहीहंडीत व्यस्त; शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन
अर्धापूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येथे शेतकरी पुत्रांनी दुष्काळी दहीहंडी फोडत शासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधले. जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपून जात असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दहीहंडी उत्सवाला शेतकरी पुत्रांचा विरोध नाही; मात्र धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली सुरू असलेल्या नाच-गाण्याच्या कार्यक्रमांवर त्यांनी आक्षेप घेतला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राजकीय दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यास मात्र वेळ नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिकांवर संकट आले आहे. अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. त्यामुळे उत्पादनाची मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासमोर आता पुढील हंगाम, कर्जफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांचे प्रश्न उभे ठाकले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे, यासाठी भोकर फाटा येथे दुष्काळी दहीहंडी फोडण्यात आली. आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच आवश्यक त्या सवलती द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी राजकीय कार्यक्रमांपेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी अपेक्षाही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या संकटाकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी पुत्रांनी दिला. त्यामुळे आता शासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि दुष्काळी परिस्थितीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Post Views: 4
[ads2]
















Leave a Reply