![]()
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात रुई बयाजीनगर येथे एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रेमसंबंधातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, ता. बारामती) असे आहे. विक्रम कोळपे यांचे मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सृष्टी विकास मते आणि तिच्या पालकांविरोधात (सर्व रा. खडकवासला, पुणे) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम आणि सृष्टी मते यांच्यात मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. फिर्यादीनुसार, सुरुवातीला सृष्टीने लग्नाचे आश्वासन दिले होते; मात्र नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे सांगत तिने लग्नास नकार दिला. २७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रुती यांनी विक्रमला वारंवार फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेल करणे सुरू केले, असा आरोप फिर्यादीत आहे. तसेच, विक्रमला पुणे येथे बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आल्याचे आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही नमूद आहे. सृष्टीचे वडील विकास मते यांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, “आई मला माफ कर. मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिठ्ठीत संबंधित व्यक्तींनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख केल्याचेही समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत आहेत.
बारामती येथे तरुणाची आत्महत्या:प्रेमसंबंधातून मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल, तिघांविरुद्ध गुन्हा
