![]()
ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन मालकांना जास्त भाड्याचे आमिष दाखवून तब्बल कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक-5 ने केलेल्या कारवाईत 32 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी उलवे, नवी मुंबई येथील 38 वर्षीय संदीप रघु शेट्टीला अटक करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई, लोणावळा, पुणे (आळेफाटा), कल्याण आणि पनवेल या भागातून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 2 कोटी 44 लाख 15 हजार इतकी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप शेट्टी हा वाहन मालकांना जास्त मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवत असे. त्यानंतर विश्वास संपादन केल्यानंतर तो वाहने आपल्या ताब्यात घ्यायचा आणि नंतर तीच वाहने इतरांकडे गहाण ठेवायचा. अशा प्रकारे अनेक वाहन मालकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. काही मालकांना आपली वाहने कुठे आहेत, याची देखील माहिती नसायची. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेने विविध ठिकाणी समन्वय साधत ही मोठी कारवाई केली असून, या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. केवळ जादा भाड्याच्या आमिषाला बळी न पडता, वाहन भाड्याने देताना कागदपत्रांची योग्य पडताळणी आणि रीतसर लेखी करार करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांचे आवाहन आणि खबरदारी नागरिकांनी आपली वाहने भाड्याने देताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. फसवणुकीच्या रॅकेटला बळी पडू नये यासाठी अधिकृत लेखी करार करणे, समोरच्या व्यक्तीच्या ओळखपत्राची आणि पत्त्याची सखोल खातरजमा करणे, तसेच प्रत्येक व्यवहाराची लेखी नोंद ठेवणे अनिवार्य आहे. या प्राथमिक नियमांचे पालन न केल्यास मालकांना मोठ्या आर्थिक किंवा कायदेशीर संकटाचा सामना करावा लागू शकतो. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस सध्या सखोल तपास करत असून, आगामी काळात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपीला नेमकी कोणी मदत केली आणि या रॅकेटमागे मुख्य सूत्रधार कोण आहे, या दिशेने पोलिसांचे तपासचक्र वेगाने फिरत आहे. लवकरच या प्रकरणातील इतर सहभागांचाही पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत.
जास्त भाड्याचे आमिष दाखवून घ्यायचा गाड्या:तीच वाहने पैशांसाठी ठेवायचा गहाण, ठाण्यात आरोपीकडून 32 चारचाकी जप्त
