विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमुळे 200 शिक्षकांच्या नोकरीवर टाच:20 फेब्रुवारीपासून समायोजन प्रक्रिया सुरू होणार, शिक्षकांमध्ये धाकधूक




अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमुळे २०० हून अधिक शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. शासनाने शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या विचारात न घेता, केवळ आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ‘संचमान्यता’साठी ग्राह्य धरली आहे. यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षक समितीने आवाज उचलला आहे. आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या विचारात न घेता, शाळेत प्रत्यक्ष प्रवेशित आणि उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. शासनाने शिक्षकांना विनाकारण अतिरिक्त ठरवून त्यांचे समायोजन करू नये, असे समितीचे म्हणणे आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांना निवेदन दिले आहे. प्राथमिक शिक्षक समितीने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी काही सूचना केल्या आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागा रिक्त दाखवण्यात याव्यात, तसेच समानीकरणाच्या जागाही रिक्त म्हणून विचारात घ्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. यामुळे शिक्षकांना योग्य न्याय मिळेल, असे समितीचे म्हणणे आहे. नुकतीच प्रसिद्ध झालेली २०२५-२६ ची ‘संचमान्यता’ विद्यार्थ्यांच्या वैध आधारकार्ड संख्येवर आधारित आहे. शाळेतील प्रत्यक्ष प्रवेशित आणि उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या विचारात न घेता, केवळ आधार वैध विद्यार्थी संख्याच विचारात घेतल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे अनेक शाळांमधील २०० हून अधिक शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत, कारण पुरेसे विद्यार्थी असूनही शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. निवेदन सादर करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे, तालुकाध्यक्ष तुळशीदास धांडे, भातकुलीचे उमेश चुनकीकर आणि संतोष राऊत, तसेच प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा दाखवण्यात याव्यात. अमरावती जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे समायोजन २० फेब्रुवारी रोजी करण्यात यावे. तसेच, तालुक्यात अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची माहिती २४ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा कार्यालयाला सादर करावी, असे या आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks