श. प. राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा:शहा यांना सुळेंनंतर तटकरेही भेटले, केंद्रात एक अन् राज्यात दोन मंत्रिपदांची गणितं?




शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वातील ‘एनडीए’त सहभागी होण्याच्या हालचाली तीव्र केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरेंनीही शहा यांची स्वतंत्र भेट घेतल्याने राजकीय भूकंपाची चर्चा वाढली आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी दिल्लीत विद्यार्थी आंदोलक नेते अभिजित दीपकेंची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी ते सुप्रिया सुळेंना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यावर पवार म्हणाले होते की, मी आधी विद्यार्थी आंदोलनाविषयी मोदींशी चर्चा केली. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. मात्र, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदींना भेटले. त्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाविषयी फडणवीसांनी मुद्दे मांडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विलीनीकरण टाळून सत्तेत सहभागाची रणनीती शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्याच्या तयारीत आहे. कारण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटात एकमत झालेले नाही. या संभाव्य सत्ता सहभागात शरद पवार गटाला केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात अर्थखात्यासह दोन महत्त्वाची मंत्रिपदे मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदलामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी दूर करत थेट दिल्लीतूनच या समीकरणांची सूत्रे हलवली जात आहेत. लेकीच्या रिसेप्शन सोहळ्याचे दिले निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर आता दिल्लीत भव्य ‘रिसेप्शन’ चे आयोजन करण्यात आले आहे. आगामी 8 ऑगस्ट रोजी दिल्लीतील शरद पवार यांच्या ‘6 जनपथ’ या शासकीय निवासस्थानी हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे आदरपूर्वक निमंत्रण देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *