![]()
‘मतदार यादी पुनरीक्षण’ ही केवळ एक रुक्ष सरकारी प्रक्रिया न राहता, बुलढाण्यातील मलकापूर येथे एका आईसाठी तब्बल 24 वर्षांची प्रतीक्षा संपवणारी एक अनोखी घटना ठरली आहे. याच मोहिमेमुळे, लहानपणी घर सोडून गेलेला तिचा मुलगा मोठा होऊन पुन्हा आपल्या आईच्या कुशीत परतला. शासन व्यवस्थेचा संवेदनशील चेहरा अधोरेखित करणारी ही घटना अतिशय हृदयस्पर्शी असून, अनेक वर्षांनंतर झालेली माय-लेकराची ही भेट पाहून केवळ कुटुंबीयांच्याच नव्हे, तर या प्रक्रियेत मदत करणाऱ्या बीएलओंच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगावचा रहिवासी असलेला नवनाथ धोंडीबा गायकवाड हा कौटुंबिक वादामुळे तब्बल 24 वर्षांपूर्वी आपले घर सोडून निघून गेला होता. अनेक गावांमध्ये भटकंती केल्यानंतर तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे स्थायिक झाला आणि तिथेच त्याने आपला नवीन संसार थाटला. मात्र, इकडे त्याची जन्मदाती आई, भाऊ आणि बहीण वर्षानुवर्षे त्याच्या परतण्याची आशेने वाट पाहत होते. 24 वर्षांपासून होते बेपत्ता 24 वर्षांची ही प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याचे निमित्त ठरली ती राज्यात सुरू असलेली ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षण मोहीम. या प्रक्रियेअंतर्गत माहिती संकलनासाठी बीएलओ नीता भोंबे आणि सहाय्यक बीएलओ अनिल भोंबे हे नवनाथ यांच्या घरी पोहोचले. कागदपत्रांची पडताळणी करताना नवनाथ यांचे नाव सोलापूरच्या मतदार यादीशी जोडले गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ करमाळा येथील बीएलओंशी संपर्क साधला आणि तब्बल 24 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या नवनाथचा ठावठिकाणा अखेर लागला. दोन तपांनंतर आईने आपल्या पोटच्या गोळ्याला घट्ट मिठी मारली आपला हरवलेला मुलगा जिवंत असल्याची आणि तो मलकापुरात असल्याची आनंदाची बातमी मिळताच आई, भाऊ, बहीण व इतर नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता सुमारे 400 किलोमीटरचा प्रवास केला. सकाळी अचानक आपल्या कुटुंबाला समोर पाहून नवनाथलाही सुखद धक्का बसला. तब्बल दोन तपांनंतर आईने आपल्या पोटच्या गोळ्याला घट्ट मिठी मारली, तेव्हा तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. या हृदयस्पर्शी माय-लेकराच्या भेटीने भाऊ, बहीण आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. सासूने दिले सुनेला मंगळसूत्र अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे नवनाथ यांच्या पत्नीला सुरुवातीला नेमके काय घडत आहे हे समजले नाही; मात्र सत्य परिस्थिती उलगडताच वातावरण अधिकच भावनिक झाले. सासूने प्रेमाने आपल्या सुनेचा स्वीकार करत स्वतःच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले आणि ‘आता इथे न राहता आमच्यासोबत गावी चला’ अशी साद घातली. यावर नवनाथ यांनीही लवकरच गावी परतण्याचे आश्वासन दिले. या भेटीचा सर्वात हृदयस्पर्शी पैलू म्हणजे नवनाथ यांचा धाकटा भाऊ अशोक; जे डायलिसिससाठी रुग्णालयात दाखल होते. परंतु, त्यांनी आपले उपचार पुढे ढकलून तब्बल २४ वर्षांनंतर आपल्या भावाला भेटण्याला प्राधान्य दिले. रक्ताच्या नात्याची ओढ किती विलक्षण असते, याचेच हे एक जिवंत उदाहरण ठरले. माणुसकीचे घडले दर्शन मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेली ‘एसआयआर’ प्रक्रिया या कुटुंबासाठी आयुष्यभर न विसरता येणारा एक सुखद क्षण घेऊन आली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका आईला तिचा हरवलेला मुलगा, भावाला मोठा भाऊ आणि बहिणीला तिचा लाडका भाऊ तब्बल दोन तपांनंतर परत मिळाला. केवळ सरकारी कागदपत्रांच्या पडताळणीतून अनेक वर्षांपूर्वी दुरावलेले हे नाते पुन्हा एकदा नव्याने जुळून आले. मलकापूर येथे घडलेली ही सुखद घटना शासन व्यवस्थेचे संवेदनशील रूप आणि माणुसकीचा एक अत्यंत सुंदर चेहरा समाजासमोर आणणारी ठरली आहे.