![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. “मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही आणि यापुढे गोकुळचा चेअरमनही राहणार नाही. आता कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे संकेत दिले. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये यवतमाळमध्ये कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेवर हसन मुश्रीफ यांनी दुःख व्यक्त केले. कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप सुरू असून ज्यांचे नाव यादीत नाही त्यांनी घाबरून न जाता संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि संयुक्त निबंधक यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नावाचा समावेश का झाला नाही, याची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. “आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे चुकीचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे त्याचे कुटुंब आणि मुलांचा संसार असतो,” असेही त्यांनी नमूद केले. अलमट्टी धरणाची उंची कमी करण्याची मागणी कायम आलमट्टी धरणाच्या पाणीपातळीबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, जल आयोगाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पाणी साठवले जात आहे. सध्या कोयना, कृष्णा, दूधगंगा यांसारख्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असून भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी आलमट्टी धरणाची उंची कमी करणे आवश्यक आहे. अन्यथा याबाबत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. एमपीएससी पेपरफुटीबाबत माहिती घेणार औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, “या प्रकरणाची संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही. परीक्षा घेणाऱ्या संस्थांकडून नेमके काय घडले याची माहिती घेऊन नंतर भूमिका मांडेन,” असे सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील निधी वाटपावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना त्यांनी युतीतील आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे सांगितले. “हे आमच्या घरातील प्रकरण आहे. विकासकामांसाठी निधी हवा आहे. आम्ही बसून योग्य मार्ग काढू,” असे ते म्हणाले. इथेनॉलविरोधी मोहिमेवर टीका इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात सुरू झालेल्या मोहिमेवर त्यांनी टीका केली. इथेनॉलमुळे देशाच्या इंधन आयात खर्चात बचत होत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. काहीजण जाणीवपूर्वक इथेनॉलविरोधी वातावरण तयार करत असून त्यामागे तेल कंपन्यांचे हितसंबंध असू शकतात, असा आरोपही त्यांनी केला. गोकुळनंतर सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाला संधी गोकुळची निवडणूक न लढवण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी घेतल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाबाबतही आपण यापूर्वीच पुन्हा चेअरमन न होण्याची भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालक संजय बाबा घाडगे यांनी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुश्रीफ यांनी कौतुक केले. कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून त्यांना मदत केल्याचे सांगत, “सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे हे पाऊल आहे,” असे ते म्हणाले. संबंधित बातम्या वाचा.. स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीवरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप: MPSC आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न; परीक्षा शुल्कातून कोट्यवधींची उलाढाल; पैशांचे काय होते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी आयोगावर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला कथित खेळ, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, परीक्षा शुल्कातून होणारा आर्थिक व्यवहार आणि पेपरफुटीमागील साखळी यावर त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सविस्तर वाचा MPSC पेपरफुटीच्या दाव्यावरून रोहित पवार आक्रमक:सरकारला 10 दिवसांचा अल्टीमेटम; म्हणाले- कारवाई न झाल्यास दिल्लीसारखे आंदोलन उभारू राज्यात टीईटी, पोलीस भरती आणि नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आले असतानाच, आता थेट ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (MPSC) पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. MPSC मार्फत घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’ भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘महाराष्ट्रातील पेपर लीकचा काळा अध्याय’ या नावाने पत्रकार परिषद घेत पवारांनी या कथित पेपरफुटीचे धागेदोरे, व्हॉट्सॲपवरील पुरावे आणि थेट MPSC च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास येत्या १० दिवसांत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. सविस्तर वाचा