महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी आयोगावर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू
.
SBIचा मोठा नफा परीक्षा चलनांमधून
अंधारे यांनी एसबीआयच्या 2019-20च्या अहवालाचा संदर्भ देत म्हटले की, बँकेचा सर्वाधिक नफा (प्रॉफिट) हा होम लोन किंवा वेहिकल लोनमधून नसून, विद्यार्थ्यांकडून भरल्या जाणाऱ्या परीक्षांच्या चलनांतून (DD) येतो. “उदा. टीईटीसाठी 5 लाखांवर विद्यार्थी बसतात. प्रत्येकी 1000 रुपये जरी धरले, तरी अनेक कोटी रुपये जमा होतात. हे पेपर फुटल्यानंतर या पैशांचे काय होते? ते कोणाच्या खिशात जातात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एमपीएससीच्या अध्यक्षांवर आणि आयोगावर निशाणा
एमपीएससीचे अध्यक्ष हे योगायोगाने मुख्यमंत्र्यांच्या गावचे (नागपूर) आहेत. एमपीएससीने पेपरफुटी झालीच नाही असा दावा आधी केला, नंतर झाली असेल तर चौकशी करू असे म्हटले आणि आता एका विद्यार्थ्याच्या मेलला ‘बनावट’ ठरवले आहे. एमपीएससीने समोरासमोर बसून चर्चा करावी, असे आव्हान अंधारे यांनी दिले.
विद्यार्थ्यांवर एमपीएससीचा दबाव असल्याचा गंभीर आरोप
ज्या विद्यार्थ्याने एमपीएससीला स्क्रीनशॉट आणि वेळेसह पेपरफुटीची तक्रार केली होती, त्या विद्यार्थ्यावर एमपीएससीने प्रचंड दबाव आणल्याचा आरोप अंधारे यांनी केला. “त्या विद्यार्थ्याला ब्लॅकलिस्ट करण्याची किंवा पुन्हा परीक्षेत बसू न देण्याची धमकी दिली गेली असावी, त्यामुळेच तो मुलगा आता नॉट रिचेबल आहे. त्याच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
पुणे मनपाच्या अभियंत्यांच्या परीक्षेतही घोळ
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या 169 जागांसाठी 44 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. अंधारे यांनी आरोप केला की, या परीक्षेतही शेवटच्या अर्ध्या तासात कॉम्प्युटरचे फोटो काढून पेपर फोडण्यात आले आणि ज्या मुलांनी माहिती अधिकारात मार्कशीट मागवली, त्यांनाच जाणीवपूर्वक नापास केले गेले.
काळ्या यादीतील कंपन्यांनाच वारंवार कंत्राट
पेपरफुटीचे गुन्हे दाखल असलेल्या ‘एसएमबी’ (SMB), टीसीएस (TCS) च्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्या आणि प्रीतीश देशमुख यांसारख्या आधीच गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना वारंवार परीक्षा घेण्याचे कंत्राट का दिले जाते? असा प्रश्न त्यांनी विचारला. या कंपन्या मुद्दाम नॉन-टेक्निकल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा घेऊन टेक्निकल घोळ करतात, असे त्यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटलांच्या ‘आंबे चोरीच्या’ वक्तव्याचा खरपूस समाचार
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेपरफुटीची तुलना ‘आंबे चोरी’शी केली होती. यावर संताप व्यक्त करत अंधारे म्हणाल्या, “भाजपच्या लोकांना आंब्याचे फार प्रेम आहे. पण आंबा चोरल्याने कोणाचे आयुष्य बरबाद होत नाही, पेपर फुटल्याने मात्र विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होते. हे समजण्याइतपत शहाणपण पाटलांनी दाखवावे.”
मुख्यमंत्र्यांवर टीका- चकार शब्दही बोलत नाहीत
“आमच्या काळात पेपर फुटले नाहीत,” असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळात टीईटी, एमएच-सीईटी, कृषी विभाग, मृदा व जलसंधारण आणि आता पुणे मनपाचे पेपर फुटले आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री यावर चकार शब्दही बोलत नाहीत, ही यंत्रणेची ढिम्म अवस्था आहे, अशी टीका त्यांनी केली.
क्लासेसच्या संचालकांची चौकशी का नाही?
नीट, पोलीस भरती आणि औषध निरीक्षक या सर्व परीक्षांमध्ये पेपरफुटीशी संबंधित स्थानिक क्लासेसची नावे (उदा. कौटिल्य अकॅडमीचे प्रवीण पाटील) समोर येत आहेत. मात्र, सरकार या क्लासेसच्या संचालकांची सखोल चौकशी का करत नाही? त्यांना कुणाचे अभय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गिरीश महाजनांवरही प्रश्नचिन्ह
मागच्या वर्षी आणि या वर्षीही औषध निरीक्षकाचा पेपर जळगाव-नंदुरबार भागातच कसा फुटतो? हा भाग गिरीश महाजनांच्या प्रभावाखाली आहे. ते जर सगळीकडे संकटमोचक असतील, तर या पेपरफुटीच्या संकटावर ते का बोलत नाहीत? असे अंधारे म्हणाल्या.
‘सीजेपी’ आंदोलक आणि कपिल सिब्बल यांची भेट
CJP चे अभिजीत दीपके आणि वकील कपिल सिब्बल यांच्या भेटीवर बोलताना अंधारे यांनी स्पष्ट केले की, पाटणा आणि दादरमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या विद्यार्थ्यांचे कायदेशीर संरक्षण कसे करता येईल, या हेतूनेच ही भेट झाली होती. यातून कोणतेही नवीन राजकीय आव्हान उभे राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पार्श्वभूमी काय?
देशभरात नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या आरोपांनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. दिल्लीसह अनेक शहरांत विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई आणि पेपरफुटी रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू केली असून, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि जलद तपासासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची घोषणाही केली आहे. राज्यातही एमपीएससीसह विविध भरती प्रक्रियांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे.
हेही वाचा…
MPSC पेपरफुटीच्या दाव्यावरून रोहित पवार आक्रमक:सरकारला 10 दिवसांचा अल्टीमेटम; म्हणाले- कारवाई न झाल्यास दिल्लीसारखे आंदोलन उभारू

राज्यात टीईटी, पोलीस भरती आणि नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आले असतानाच, आता थेट ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (MPSC) पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. MPSC मार्फत घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’ भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
पेपरफुटीचं हे रॅकेट कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरूय?:MPSC ‘औषध निरीक्षक’ भरतीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात

देशभरात ‘नीट’ परीक्षेचा वाद पेटलेला असतानाच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ‘औषध निरीक्षक’ भरतीत पेपरफुटी आणि गुणांमध्ये फेरफार झाल्याच्या दाव्याने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उमेदवारांनी या कथित गैरव्यवहाराचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि डिजिटल पुरावे आयोगाला सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांच्यानंतर आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुराव्यांसह तक्रारी समोर येऊनही सरकार शांत का? असा संतप्त सवाल करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा