![]()
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली गेली. अजूनही अजित पवार आपल्यात नाहीत यावर कोणाचा विश्वास देखील बसत नाही. त्यात त्यांच्या विमान अपघातावरून अनेकांकडून तर्क-वितर्क लावले जात आहेत. आता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी कारने बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारीही झाली होती. परंतु, आयत्या वेळेस एक महत्त्वाचे काम घेऊन प्रफुल्ल पटेल आले, त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कार ऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. त्याच विमानाला अपघात झाला आणि आपण अजितदादांना गमावले, अशी धक्कादायक माहिती प्रमोद हिंदुराव यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन मंगेशी बँक्वेट सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते हिंदुराव बोलत होते. अजित पवार कारनेच जाणार होते, पण तेवढ्यात… प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले की, अजित पवार यांचे बाय रोड जाण्याचे ठरले होते. सर्व बॅगा गाडीत टाकल्या. परंतु त्याचवेळी प्रफुल पटेल की आणखी कुणाचा फोन दादांना आला. मंत्रालयात एक फाईल अडकली आहे. त्याच्यावर सही हवी आहे. म्हणून अजित पवार यांनी सचिवाला फोन केला, ती फाईल लवकर घेऊन ये, पुन्हा मी आठवडाभर नाहीये, असे त्यांनी सचिवाला सांगितले. परंतु फाईल आणायला साडेसात आठ वाजले. मग उशीर झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की मी विमानाने जातो. गाडीतल्या बॅगा त्यांनी परत काढल्या, आणि ती अघटीत घटना घडली. पुढे बोलताना प्रमोद हिंदुराव म्हणाले, अजितदादांबरोबर आपले 39 वर्षे अतिशय जवळचे संबंध होते, त्यांचा दुसऱ्या दिवशी होणारा कार्यक्रम आपल्याकडे नेहमी पोहचत असे. दादांच्या अनेक कामांचे आपण साक्षीदार आहोत, कल्याणला आपल्या घरी दादा आणि सुनेत्रा वहिनी अनेकदा येऊन गेले. दादांनी शेवटची भेट आपल्या घरी दिली तेव्हा आपण त्यांना माळशेज घाटापर्यंत सोडायला गेलो होतो. त्यासमयी झालेल्या संवादाची माहिती देत हिंदुराव यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. विदीप जाधव विमानात पहिल्यांदाच दादांच्या शेजारी बसले होते तसेच प्रमोद हिंदुराव यांनी आणखी एक माहिती अशी दिली की, अजित पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव कधीच अजितदादांच्या शेजारी विमानात बसला नव्हता. तो पहिल्यांदाच विमानात दादांच्या शेजारी बसला, तो फोटो त्याने त्याच्या घरच्यांना पाठवला. तोच फोटो त्यांचा अखेरचा ठरला, असे हिंदुराव यांनी सांगितले.
अजित पवार कारनेच जाणार होते:प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि प्रवासाचा निर्णय बदलला, प्रमोद हिंदुरावांचा दावा
