श्री राजपूत समाजाचा ३३ व सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
नांदेड (प्रतिनिधी)- श्रीक्षत्रिय समाज राजपूत यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सामुदायिक विवाह मेळावा काल अत्यंत उत्साह, आनंद आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात मोठ्या यशस्वीपणे पार पडला. हा मेळावा समाजाचा ३३ वा सामूहिक विवाह सोहळा असून, यंदा एकूण २४ नवदांपत्यांचे पवित्र विवाहबंधनात बांधले गेले.
क्षत्रिय समाज राजपूत यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम दरवर्षी वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळील खुशालसिंहजी नगर येथे पार पडतो. सामाजिक बांधिलकी, समतेचा संदेश आणि संस्कृतीचे जतन या मूल्यांचे उत्कृष्ट दर्शन या सोहळ्यातून घडते.
यंदाच्या विवाह मेळाव्यास १०८ डॉक्टर वीरूपाप शिवाचार्य महास्वामी, १०८ सिद्धता शिवाचार्य महाराजजी, संत बाबा बलविंदर सिंगजी, संत हरीगीर गुरु दत्त गीर महाराज, हरिसिंह काथी,हेमुसिह निकुंभ, बन्सी सिंग सगर, शालिग्राम सिंग परमार, धनु सिंग परमार, महादेव सिंग गहेरवार,कचरूसिंह अग्निवंशी, मोहनसिंह कौशिक, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या आशीर्वादाने आणि उपस्थितीने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

हा भव्य विवाह मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेश सिंग अग्नीवंशी, सचिव गणेश सिंग कौण्डिल्य , सचिव बजरंग सिंग परिहार, कोषाध्यक्ष रविंद्र सिंग रघुवंशी,सदस्य सरदार सिंग परमार, काळू सिंग कौशिक, हनुमान सिंग गहलोत, कैनूर सिंह निकुंभ, परसराम सिंग विदेव, सुनील सिंग परमार, उमेश सिंग परमार, विक्रम सिंग काथी यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांची स्थापना करण्यात आली होती.
यामध्ये वधू-वर व्यवस्था समिती, सामूहिक विवाह देखरेख समिती, मंगलाष्टक वेळ व्यवस्थापन समिती, भोजन व्यवस्था समिती, वधू-वर भोजन समिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समिती तसेच बस सेवा समिती यांचा समावेश होता. या सर्व समित्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध कामगिरी केली. अनेक महिला मंडळांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून सामाजिक सहकार्याचा आदर्श निर्माण केला.
दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. सायंकाळी ६.३५ वाजता मंगलाष्टकांच्या मधुर घोषात २४ नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यात आले. अंतिम मंगलाष्टकानंतर संपूर्ण परिसर भव्य विद्युत रोषणाईने उजळून निघाला.
या सोहळ्याच्या निमित्ताने सुमारे ५,००० पाहुणे , आगंतुक आणि नागरिकांसाठी सुस्वादु भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आनंद, समाधान आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेने ओतप्रोत भरलेला हा सामुदायिक विवाह मेळावा उपस्थित सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
