अधिकाऱ्यांनी चिखलात अनुभवले बळीराजाचे कष्ट:पाडळी देशमुख येथे कृषी विभागातर्फे चारसूत्री भात लागवड आणि जीवामृत प्रात्यक्षिक‎




शेतात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे. मात्र, त्याचे कष्ट किती अथांग असतात, याची प्रचिती मातीत उतरल्याशिवाय येत नाही, याचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आणि इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मुसळधार पावसात थेट शेतात उतरून बळीराजाच्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत शेतकरी वर्षभर कशी मेहनत करतो, हे कागदोपत्री समजण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अधिकाऱ्यांनी गुडघ्यापर्यंत चिखलात उतरून भात लागवडीची पाहणी केली. मुसळधार पाऊस आणि चिखलाच्या प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता त्यांनी भात लावणीची प्रक्रिया जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब किती मोलाचा असतो, हे आज चिखलात उतरल्यावर समजले. हा केवळ अनुभव नसून, आमच्यातील संवेदनशीलता अधिक तीव्र करणारा क्षण आहे, अशी भावना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आणि आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी व्यक्त केली. पुष्पांजली प्रल्हाद धांडे यांच्या शेतावर चारसूत्री भात लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अभिमन्यू काशीद यांनी जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिक देत नैसर्गिक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. चारसूत्री लागवडीने उत्पादनवाढीचा संदेश पाडळी देशमुख येथे सादर करण्यात आलेल्या चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीचा संदेश देण्यात आला. चिखलणीपूर्वी गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर, २५×२५ सेंमी अंतरावर नियंत्रित लागवड, रोपांवर महाजैविक प्रक्रिया आणि जीवामृताचा वापर या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी होऊन भात उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *