राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडतंय काय?:दिल्लीत तटकरे – पटेल गटाच्या ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कार्यालयात रोखले; समज दिल्याचीही चर्चा

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-16t13_1778919742.png




सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज या दोन्ही नेत्यांच्या एका जवळच्या नेत्याला दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रोखून धरण्यात आल्याची घटना घडली आहे. या नेत्याला पक्षाविषयी गैरसमज न पसरवण्याची कथित तंबीही देण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना दिल्ली स्थित कार्यालयात रोखून धरले. यावेळी त्यांना पक्षाची बदनामी का करता? असा प्रश्न करत पक्षासंदर्भात चुकीची माहिती पसरवण्याप्रकरणी समज देण्यात आली. श्रीवास्तव हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्या गोटातील पदाधिकारी मानले जातात. त्यामुळे त्यांनाच रोखण्यात आल्यामुळे याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण राष्ट्रवादीने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा करत हे वृत्त फेटाळले आहे. आमच्या कार्यालयात अशी कोणतीही घटना घडली नाही. आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने असे कृत्य केले नाही. काही लोक या प्रकरणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत असून, त्याविषयी पक्षात रोष आहे. पक्षाचे कार्यकर्ते व पक्ष पार्थ पवार, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सांगितले. ब्रिजमोहन श्रीवास्तवांची नाराजी काय? ब्रिजमोहन श्रीवास्तव हे पूर्वी राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाचे पक्षाचे अधिकृत संपर्क प्रमुख होते. त्यांच्याच ईमेलच्या माध्यमातून पक्षाचा सर्व पत्रव्यवहार होत होता. पण त्यांच्यावर पक्षाची घटना बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. त्यानंतर पक्षाच्या नव्या कार्यकारिणीतून त्यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे श्रीवास्तव प्रचंड नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी माध्यमांना पक्षात अंतर्गत वाद असून नव्या कार्यकारिणीत केवळ नातेवाईकांनाच स्थान देण्यात आल्याचे संदेश पाठवले. विशेष म्हणजे या संदेशात चुकीचे नाते दाखवून पवार कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांच्या याच भूमिकेचे पडसाद आज राष्ट्रवादीच्या दिल्लीतील कार्यालयात उमटल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखून त्यांना याविषयी जाब विचारला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे. हे ही वाचा… राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू झालाय का?:सुनेत्रा पवारांसाठी नाजूक काळ; सुनील तटकरे – प्रफुल्ल पटेल नाराज झालेत का? पुढे काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी हे वृत्त फेटाळले असले, तरी त्यानंतर घडलेल्या राजकीय भेटीगाठी व सूचक विधानांमुळे या चर्चेला अधिक धार मिळाली आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed