![]()
भोसरी येथील धावडे वस्तीमध्ये गुरुवारी (५ फेब्रुवारी) सायंकाळी एका तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर तरुणाकडे एक चिठ्ठी सापडली असून, त्यात त्याने पोलिसांवर मदत न केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्याची पत्नी बेपत्ता असून, तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय त्याने व्यक्त केला होता. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव केशरी प्रसाद साहू (मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश, सध्या भोसरी, पुणे) असे आहे. गुरुवारी दुपारी साहू धावडे वस्ती येथील एका इमारतीवर चढला. तो इमारतीवरून उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी साहूने त्याच्या पत्नीसोबत बोलण्याची मागणी केली. त्यानुसार, त्याचे पत्नीसोबत बोलणे करून देण्यात आले. त्यानंतरही त्याने अचानक इमारतीवरून खाली उडी मारली. साहूच्या मृतदेहाजवळ चार पानांची चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत त्याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याची पत्नी बेपत्ता झाल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. संशयित व्यक्तींची चौकशी करावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि पत्नीला शोधून आणावे, अशी मागणी त्याने केली होती. मात्र, त्याला पोलिसांकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. चिठ्ठीत साहूने असेही म्हटले आहे की, “माझी बायको कुठेही राहू शकत नाही. तिला माझ्याकडे परत आणा. ती परत येईल. बायको माझ्यासोबत नाही राहिली तर मुलीसाठी मी जगेन. माझ्या मृत्यूनंतर मला दफन करा. अग्निसंस्कार केले तर मुलीच्या हस्ते करा. पत्नी जिथे आहे तिथे जास्त दिवस राहणार नाही. तिला गावी सोडा.”
भोसरीमध्ये तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या:पोलिसांवर मदत न केल्याचा आरोप, चिठ्ठीत धक्कादायक उल्लेख
