हिंगोलीत 3 ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली:34 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
![]()
हिंगोली जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने विविध तीन ठिकाणी वाहनांच्या तपासणीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहने पकडली असून 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सेनगाव, हट्टा, बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील बन ते कापडसिंगी मार्गावर अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे यांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली. यामध्ये रायगाव पाटीजवळ एका टिप्परमधून वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. या पथकाने चालक काशीनाथ वाघ (रा. बन) याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून वाळू वाहतुकीची परवानगी आढळून आली नाही. त्यामुळे टिप्पर व वाळू असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे यांच्या तक्रारीवरून काशीनाथ बन, दिलीप सानप (रा. चिंचाबा भार, ता. रिसोड) याच्या विरुध्द सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या सोबतच हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झिरोफाटा ते वसमत मार्गावर केलेल्या तपासणीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे एक टिप्पर ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जमादार आझम प्यारेवाले यांच्या तक्रारीवरून संतोष नरवाडे (रा. ढउळगाव), उध्दव जगताप (रा. हट्टा) यांच्या विरुध्द हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 20.25 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान, भटसावंगी तांडा शिवारातील कयाधू नदी पात्रात मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून एक ट्रॅक्टर व वाळू असा 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मंडळ अधिकारी अशोक चंडके यांच्या तक्रारीवरून बासंबा पोलिस ठाण्यात शिवाजी जाधव (रा. भटसावंगीतांडा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे पुढील तपास करीत आहेत.
