नांदेड (प्रतिनिधी) – जालना आणि नांदेड जोडणाऱ्या प्रस्तावित समृद्धी महामार्गास दहावे पातशाह श्री गुरु गोविंद सिंघ जी समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे, अशी नम्र मागणी नांदेडच्या नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी हे निवेदन नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृतपणे सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नांदेड हे तख्त सचखंड श्री हज़ूर अबचलनगर साहिब या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध गुरुद्वारामुळे जगभरातील श्रद्धाळूंसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे. सन १७०८ मध्ये श्री गुरु गोविंद सिंघ जी यांनी याच पवित्र भूमीत श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांना शाश्वत गुरुचे स्थान प्रदान केले होते. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक भक्तिभावाने नांदेड येथे येतात.
जालना-नांदेड जोडणीचा प्रस्ताव शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये नोंदवण्यात आला असून, हा महामार्ग नांदेडच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि विशेषतः धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गाला श्री गुरु गोविंद सिंघ जी यांचे नाव दिल्याने नांदेडच्या समृद्ध इतिहासाची ओळख देश-विदेशातील प्रवाशांना होईल तसेच गुरुजींच्या शौर्य, त्याग, समानता आणि मानवतेचा संदेश दूरवर पोहोचण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
या मागणी निवेदनाच्या प्रती पुढील योग्य कार्यवाहीसाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये:
- अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री व राज्यसभा सदस्य)
- अजित गोपछडे (राज्यसभा सदस्य)
- आनंदराव पाटील बोंढारकर (आमदार, नांदेड)
- बालाजी कल्याणकर (आमदार, नांदेड)
- जिल्हाधिकारी, नांदेड
नांदेडच्या नागरिकांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनावर तेजपाल सिंघ खेड, गुरमीत सिंघ महाजन, महेंद्र सिंघ लांगरी, विनोद सिंघ रामगडीया, मनजिंदर सिंघ लांगरी आणि जसप्रित सिंघ शाह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 48
