![]()
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यापुढे कोणत्याही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास, ती शाळा ज्या संस्थेद्वारे चालवली जाते, त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.येत्या १० फेब्रुवारीपासून बारावीची तर २० फेब्रुवारीपासून दहावीची वार्षिक परीक्षा सुरू होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी (५ फेब्रुवारी) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली असून, त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्र म्हणून शाळा ताब्यात घेण्यापूर्वी संस्थाचालकांनी ती स्वच्छ करून द्यावीत. विशेषतः, कॉपी लपविल्या जाण्याची शक्यता असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता तपासली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील काही केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. दहावीच्या १८७ पैकी ३४ आणि बारावीच्या १३७ पैकी ४३ केंद्रांना शिक्षण विभागाने ‘उपद्रवी केंद्र’ म्हणून घोषित केले आहे. या केंद्रांवर यापूर्वी वैयक्तिक आणि सांघिक कॉपीचे प्रकार घडले आहेत. ही बहुतेक केंद्रे ग्रामीण भागात असून, तेथे परीक्षा काळात कायमस्वरूपी अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे. संवेदनशील केंद्रांवर परीक्षेच्या कामाव्यतिरिक्त पाच अतिरिक्त अधिकाऱ्यांचा ताफा दररोज तैनात राहील, जो केवळ कॉपी होणार नाही याची खात्री करेल. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र आणि शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख उपस्थित होत्या.परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओ, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांसारखे सर्व वरिष्ठ अधिकारी अचानक काही केंद्रांना भेटी देणार आहेत. निकाल कमी लागला तरी चालेल, परंतु जो निकाल लागेल तो अत्यंत पारदर्शक आणि खराखुरा असावा, यासाठी जिल्हा प्रशासन यावर्षी विशेष काळजी घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कॉपी आढळल्यास संस्थाचालकांवरही कारवाई:दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
