कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे -मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे


पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड  – कारागिरांच्या पारंपरिक व्यवसायाला मदत करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या कारागिरांना विविध स्वरूपाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येतात. कारागिरांच्या व्यवसायवृद्धीसाठी अशा प्रदर्शन व विक्री उपक्रमांना महत्त्व असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.

आज लोकमान्य मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट नगर, नांदेड येथे एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उदघाटन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर  यांच्यासह  जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम ५ व ६ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला राहणार आहे. या प्रदर्शनात पारंपरिक कारागीर व शिल्पकारांना त्यांच्या कौशल्याचे सादरीकरण व थेट विक्री करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये सुतार, अस्त्र निर्माते, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई व झाडू निर्माते, पारंपरिक बाहुली व खेळणी निर्माते, मालाकार आदी विविध व्यवसायांतील विश्वकर्मा बांधव सहभागी झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यत पीएम विश्वकर्मा योजनेत 1 लाख 33 हजार 257 कारागिरांनी नोंदणी केली असून, यापैकी 4 हजार 874 कारागिरांना कर्ज मंजूर झाले असून यापैकी 4 हजार 102 कारागिरांना कर्ज वाटप झाले आहे. तर 7 हजार 594 कारागिरांना टुलकिट वाटप करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर यांनी दिली. तसेच या प्रदर्शनीत 50 कारागिरांनी सहभाग नोंदविला असून विविध व्यवसायांतील विश्वकर्मा बांधवानी स्टॉल लावले आहेत. नांदेड नंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथेही हे प्रदर्शन भरणार आहे. तरी  नागरिकांनी या प्रदर्शन व विक्रीचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेवून  विश्वकर्मा बांधवाना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post Views: 10






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *