कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात महिला आयोगाच्या 25 शिफारशी:मुख्यमंत्री फडणवीसांकडे सविस्तर अहवाल सादर; धर्मांतर प्रकरणात नवे खुलासे
![]()
नाशिकमधील गाजलेल्या टीसीएस प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असून, या अहवालानंतर तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, कथित धर्मांतराचे आरोप, तसेच पीडित महिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आयोगाच्या शिफारशींनुसार कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने 18 आणि 19 एप्रिल रोजी नाशिक दौरा करून पीडित महिला, पोलिस अधिकारी आणि संबंधित व्यक्तींशी चर्चा केली. त्यानंतर 50 हून अधिक पानांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात 25 पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या असून महिलांची सुरक्षितता, सन्मान आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. तसेच जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खान हिला न्यायालयाने 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता तिची कसून चौकशी सुरू होणार आहे. तपास यंत्रणा तिच्या भूमिकेचा बारकाईने तपास करत असून धर्मांतराच्या कथित कटात तिचा नेमका सहभाग काय होता, याचा शोध घेतला जात आहे. 25 मार्च रोजी तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ती कुठे होती, कोणाच्या संपर्कात होती, तसेच तिला आश्रय कोणी दिला, याबाबतही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. निदा खानला लपवून ठेवण्यासाठी एमआयएमच्या एका नगरसेवकाने मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मतीन पटेल नावाच्या नगरसेवकाने दोन महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या घरात निदा खान आणि तिच्या कुटुंबाला आश्रय देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी मतीन पटेलचा मोबाईल जप्त केला असून त्यालाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. या नव्या कनेक्शनमुळे तपास अधिक गंभीर बनला आहे. निदा खानच्या चौकशीत आता अनेक आंतरराज्य आणि परदेशी धागेदोरे तपासले जात आहेत. मुंबई, मुंब्रा आणि भिवंडी परिसरातील तिच्या हालचालींचा तपास सुरू असून मालेगाव आणि मलेशियाशी संबंधित काही कनेक्शन आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. मलेशियातील ‘इम्रा’ नावाच्या व्यक्तीसोबत तिचा काही संबंध आहे का, याची पडताळणी एसआयटीकडून सुरू आहे. तसेच शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या आधीपासून अटकेत असलेल्या आरोपींची चौकशीही वेगाने सुरू आहे. आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता दरम्यान, निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तिने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
