स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी:मॉडेल महिलेने जाब विचारताच अंगावर घातली कार, मुंबईतील थरारक घटनेने खळबळ; VIDEO




मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 29 वर्षीय तरुणाने एका महिलेच्या अंगावर कार चढवत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. या प्रकरणी ओशिवारा पोलिसांनी आरोपी मोहम्मद शकील शेखवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लोखंडवाला परिसरातील अरीना बिल्डिंगच्या गेटवर रात्री 9.30 च्या सुमारास घडली. आरोपी मोहम्मद शेख याने मॉडेल असलेल्या मैत्रिणीला स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली होती. या धमकीबाबत विचारणा करण्यासाठी या मॉडेल महिलेने आरोपीला तिच्या बिल्डिंगच्या गेटवर बोलावले होते. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी तरुणाने त्याच्या स्कोडा कारने महिलेला जोरदार धडक देत काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर तिथे उपस्थित दोन नागरिक महिलेच्या मदतीसाठी धावून गेले, तेव्हा आरोपीने त्यांच्याही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेत महिला किरकोळ जखमी झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बिल्डिंगच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दोघांमधील नेमका वाद काय? गेल्या 9 महिन्यांपासून, मोहम्मद शेख नावाचा आरोपी, एका मॉडेल असलेल्या पीडितेबद्दल तिच्या मित्र आणि कुटुंबियांमध्ये अफवा पसरवत होता, ज्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ती मॉडेल आणि तिची मैत्रीण आरोपीने पसरवलेल्या अफवांबद्दल त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेल्या होत्या, पण त्याने दरवाजा उघडला नाही. तो बाहेर न आल्याने त्या दोन्ही मुलींनी मोठ्याने त्याचे नाव घेऊन त्याला हाका मारल्या. अहवालात पुढे म्हटले आहे की, दुसऱ्याच दिवशी पीडितेच्या मैत्रिणीला तिच्या स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ला करण्याची धमकीचा संदेश आला. या धमकीच्या संदेशानंतर, आरोपीने मॉडेलवर गाडी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *