पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी, 15 तास मार्ग ठप्प:आडोशी बोगद्याजवळ भीषण परिस्थिती; एकाच लेनवरून वाहतूक सुरू




मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक साधारण आठ तास पूर्णपणे ठप्प राहिली. मध्यरात्रीपर्यंत परिस्थिती धोकादायक असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला होता. गॅस गळती सुरू असल्याने प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. परिणामी हजारो वाहनचालक महामार्गावरच अडकून पडले. मध्यरात्रीनंतर धोका काही प्रमाणात कमी झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर तिसऱ्या लेनवर हलवण्यात आला. त्यानंतर मुंबईच्या दिशेने केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वाहतुकीचा वेग अत्यंत मंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा कायम आहेत. सुमारे 15 तासांपासून या परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप पूर्णपणे थांबलेली नसल्याने खबरदारी म्हणून हालचालींवर बंधने ठेवण्यात आली आहेत. या कोंडीमुळे अनेक प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. काही वाहनचालक पहाटे चार वाजल्यापासून तर काही जण रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले आहेत. दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेकांची नियोजित फ्लाइट चुकल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासाच्या नियोजनावर या घटनेचा मोठा परिणाम झाला असून लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. महामार्गावर इतक्या दीर्घकाळ अडकून पडल्याने प्रवाशांचा संयम सुटू लागल्याचे दिसून आले. या दरम्यान काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. पाणी, अन्न आणि शौचालयांच्या सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागला. आपत्कालीन परिस्थितीत मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची भावना वाहनचालकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे. वेगाने पावले उचलावीत घटनेनंतर वाहनचालकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन प्रसंगी महामार्ग इतका वेळ बंद का राहतो? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तातडीने प्रभावी उपाययोजना करून महामार्ग पूर्णपणे मोकळा करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. एकाच लेनवर सुरू असलेली वाहतूक अपुरी असल्याने कोंडी कमी होण्यास वेळ लागत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिक वेगाने पावले उचलावीत, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *