एकरकमी अनुदानाच्या प्रतिक्षेत सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस महिलेने प्राण सोडले:उपचारासाठी वेळेत पैसे मिळाले नसल्याचा आरोप




कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस महिलेने एकरकमी अनुदानाच्या प्रतिक्षेत प्राण् सोडल्याचा प्रकार घडला आहे. उपचारासाठी पैसे न मिळाल्याने हि परिस्थिती ओढावल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागातील बाबुगिरीचा हा परिणाम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळमनुरी तालु्क्यातील तोंडापूर येथील अंगणवाडी मदतनीस रुख्माबाई भुरके (६०) ह्या सुमारे दिड वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या. या सेवानिवृ्त्तीनंतर त्यांना एकरकमी ७५ हजार रुपयांचे अनुदान मिळणे अपेक्षीत होते. सदर रक्कम सेवानिवृत्तीच्या तीन महिन्यात किंवा त्या आर्थिक वर्षात मिळणे आवश्‍यक होती. मात्र सुमारे दिड वर्षापुर्वी सेवानिवृत्त होऊन देखील त्यांना सदर अनुदान मिळालेच नाही. या रकमेसाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाकडे वारंवार संपर्क साधला होता. मात्र प्रत्येक वेळी त्यांना आश्‍वासनेच देण्यात आली. दरम्यान, मागील काही दिवसांपुर्वी त्यांना डोक्यात गाठी झाल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरु केला जात होता. या औषधोपचारासाठी त्यांना पैशाची नितांत गरज होती. सदर अनुदानाची रक्कम मिळेल या आशेवर त्या होत्या. मात्र सदर रक्कम त्यांना मिळालीच नाही अखेर आठ दिवसांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुख्माबाई यांना उपाचारासाठी वेळेत पैसे न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, प्रशासनातील बाबुगिरीचा फटका रुख्माबाई यांना बसला असून त्यांच्या सोबतच आणखी ३१ सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीसांचे एकरकमी अनुदान देणे बाकी असल्याचे सुत्रांनी सांगितले. पैसे वेळेत मिळाले असते तर आई वाचली असती- इंदूबाई खरोडे (मुलगी) इंदूबाई खरोडे म्हणाल्या, आई रुख्माबाई सेवानिवृत्त होऊन दिड वर्षाचा कालावधी झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्या आजारी पडल्या. औषधोपचारासाठी पैसे नव्हते तर कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने उदरनिर्वाहाचाही प्रश्‍न होता. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या पैशाची अपेक्षा होती. मात्र आईच्या हयातीत पैसे मिळालेच नाहीत. पैसे मिळाले असते तर योग्य औषधोपचार करून आई वाचली असती. निधी नसल्यामुळे रक्कम देता आली नाही- विजय बोराटे महिला बाल कल्याण विभाग उपमुख्यकार्यकारी विजय बोराटे म्हणाले, अधिकारी अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्तीनंतर १ लाख रुपये तर मदतनीसांना ७५ हजार रुपये एकरकमी दिली जाते. मात्र त्यासाठी निधी नसल्यामुळे सदर रक्कम देता आली नाही. आता निधी प्राप्त झाला असून लवकरच त्यांच्या वासराला रक्कम दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *