Satara Drug Racket Story Mumbai Pune Sawari Route | Eknath Shinde | Ajit pawar | Vijay Kumbhar | साताराच्या ड्रग्ज रॅकेटची मिस्ट्री: मुंबई ते सावरी व्हाया पुणे कसा राहिला प्रवास? जाणून संपूर्ण कहाणी – Maharashtra News



मुंबईतील मुलुंडमधील एका फूटपाथवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील ड्रग्ज कारखान्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे साताऱ्यातील ड्रग्ज रॅकेटचा ‘मुंबई ते सावरी व्हाया पुणे’ असा प्रवास झाला

.

साताराच्या ड्रग्ज रॅकेटची मिस्ट्री काय?

या प्रकरणाची सुरुवात ८ डिसेंबर रोजी मुंबईत झाली. मुलुंड पश्चिम येथील विजयनगरमधील गणेश कृपा बिल्डिंगसमोरील फूटपाथवर सलीम शेख (वय ३२) आणि रईस शेख (वय ३७) हे दोन इसम संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, सलीम शेखकडे असलेल्या एका पिशवीत एक नोटबुक सापडले. विशेष म्हणजे, या नोटबुकच्या पानावर चिकटवलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत १० ग्रॅम मेफेड्रोन (MD) लपवण्यात आले होते. याशिवाय दोघांच्या खिशातूनही मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करण्यात आले.

पुण्यातील राष्ट्रवादीचा पदाधिकारी जेरबंद

अटक केलेल्या दोघांनी हे ड्रग्ज पुण्यातील विशाल मोरे याच्याकडून आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी सापळा रचून १३ डिसेंबरला पुणे-मुंबई हायवेवर विशाल मोरेला अटक केली. विशेष बाब म्हणजे, विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीचा पुणे शहरप्रमुख आहे आणि ३ डिसेंबरलाच त्याची या पदावर नियुक्ती झाली होती.

सावरीतील ‘गोठ्यात’ ड्रग्जची फॅक्टरी

पोलिसांनी विशाल मोरेची चौकशी केली असता, त्याने ते ड्रग्ज सातारा जिल्ह्यातील सावरी येथून आणण्याले सांगितले. विशाल मोरेच्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सावरी गावात छापा टाकला. तिथे गुरांच्या गोठ्यासाठी उभारलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रोन बनवण्याचा कारखानाच सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी येथून अब्बास सय्यद, राजिकूल रेहमान आणि हाबिझुल इस्लाम या तिघांना अटक केली.

एकनाथ शिंदेंच्या भावावर गंभीर आरोप

या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावावर आरोप केले आहे. सावरीतील फॅक्टरीत काम करणाऱ्या आरोपींना ओंकार डिघे हा स्थानिक युवक जेवण पुरवत होता. हे जेवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या ‘तेज यश’ रिसॉर्टमधून येत असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. यामुळे ड्रग्ज माफियांचे कनेक्शन थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

विजय कुंभार यांचा मोठा दावा

दरम्यान, साताऱ्यातील सावरी येथील ड्रग प्रकरणाने आता वेगळे वळण घेतलेले दिसतंय. आता ती जागा आपण विकली असे एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांचे म्हणणे असले तरी त्या जागेचा नंतर व्यवहार झाला असल्याचे दिसत नाही. एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी 2020 मध्ये ही जागा सुमारे साडेतीन एकर जागा बारा लाख रुपयांमध्ये खरेदी केली आणि त्यानंतर अजून तरी तिचं हस्तांतरण झाल्याची कुठलीही माहिती पुढे येत नाही, असे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी कागदपत्रे दाखवत म्हटले आहे.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री. दोघेही दबंग राजकारणी. दोघांचेही जिल्हे म्हणजे पुणे आणि सातारा शेजारी शेजारी आहेत आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ड्रग माफिया,जमीन माफिया आणि इतर गुन्हेगारीने थैमान घातले आहे. काय अर्थ घ्यायचा याचा? असा सवालही विजय कुंभार यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *