संभाजीनगर विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेमध्ये आढळले जिवंत काडतूस:धार्मिक यात्रेदरम्यान कुणीतरी बॅगेत काडतूस टाकल्याचा प्रवाशांचा दावा




छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान दिल्लीकडे जाणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेत बंदुकीचे जिवंत काडतूस मिळून आल्याने खळबळ उडाली. बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी ८:४० वाजता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रमेशकुमार तीरथदास सखरणी (६०, रा. रोहिणी, दिल्ली) या प्रवाशावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गुरुवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. सीआयएसएफचे उपनिरीक्षक हनुमान सहाय मीना यांना ‘सेक्युरिटी होल्ड एरिया’तील स्कॅनिंग मशीनमध्ये सखरणी यांच्या बॅगेत संशयास्पद वस्तू दिसली. बॅगेत रिव्हॉल्व्हरमध्ये वापरले जाणारे इटालियन बनावटीचे ‘३८ जीएफएल’ बनावटीचे जिवंत काडतूस आढळले. शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर तत्काळ दहशतवादविरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा आणि एसआयडीच्या पथकांनी त्यांची कसून चौकशी केली. शिर्डी, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर तीर्थस्थळी होणार तपास रमेशकुमार हे दिल्लीचे मोबाइल व्यापारी आहेत. संभाजीनगरहून परतण्यापूर्वी ते २५ जानेवारीला पुण्यात उतरले होते. त्यानंतर त्यांनी भीमाशंकर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर व घृष्णेश्वर अशा धार्मिक स्थळांचा दौरा केला. प्रवासात त्यांनी अनेक ठिकाणी आपली हँडबॅग फूल विक्रेत्यांकडे ठेवली होती, असा दावा त्यांनी पोलिसांकडे केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *