बीड जेलमधील व्हायरल ऑडिओला ट्विस्ट:वाल्मीक कराडला मस्साजोग निवडणुकीसाठी लक्ष्य केल्याचा आरोप; मारहाणीचा दावा खोटा?

0
730-x-548-new-2026-04-23t160837052_1776941649.jpg




जिल्हा कारागृहातून समोर आलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. काल समोर आलेल्या एका कथित ऑडिओमध्ये कैद्यावर मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र आज त्याच कैद्याची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यात मारहाणीचा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, जेल प्रशासनासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित कैदी अझर अब्दुल रहमान पठाण आणि एका अज्ञात व्यक्तीतील संभाषण असल्याचे सांगितले जात आहे. या संभाषणात कैद्याने सांगितले की, जेलमध्ये किरकोळ वाद झाला होता, मात्र तो नंतर मिटवण्यात आला. काही कैद्यांनी आणि एका कर्मचाऱ्याने दबाव टाकून हा प्रकार वेगळ्या पद्धतीने सादर करण्यास भाग पाडले, असा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे काल समोर आलेल्या मारहाणीच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या ऑडिओमध्ये आणखी एक गंभीर मुद्दा पुढे आला आहे. मस्साजोग येथे सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाल्मीक कराड यांना लक्ष्य करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार रचला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मला दबावाखाली हे बोलायला लावले गेले, प्रत्यक्षात मोठा वाद झाला नव्हता, असेही त्या कैद्याने म्हटल्याचे समजते. या दाव्यामुळे प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांचा कोणताही संबंध नसल्याचेही या नव्या क्लिपमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कालच्या ऑडिओमध्ये विविध गंभीर आरोपांसह काही संवेदनशील उल्लेख करण्यात आले होते. त्यामुळे या विरोधाभासी दाव्यांमुळे सत्य नेमके काय आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही ऑडिओ क्लिप्सची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा कारागृहातील परिस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारागृहात नेमके काय सुरू आहे, कैद्यांवर कोणाचा दबाव आहे का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. यासंदर्भात धनंजय देशमुख यांनीही प्रतिक्रिया देत कारागृहातील प्रकार गांभीर्याने घेतले जात नसल्याचे म्हटले आहे. ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या क्लिपमुळे सर्व दाव्यांवर संशय दरम्यान, काल व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये कैद्याने गंभीर आरोप करत सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप यांनी मारहाण केल्याचा दावा केला होता. तसेच जेल प्रशासनावरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता. मात्र आजच्या नव्या क्लिपमुळे या सर्व दाव्यांवर संशय निर्माण झाला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed