बडूर येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न
बिलोली तालुक्यातील बडूर येथे महात्मा गांधी व्यसनमुक्ती अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद नांदेड समाजकल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळ, बहादरपुरा यांच्या कला पथकाच्या माध्यमातून जिल्हाभरात संगीत, पथनाट्य आणि लोकगीतांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे.
सन २०२६-२७ या वर्षातील अभियानाचा एक भाग म्हणून बडूर येथे आयोजित कार्यक्रमात कलाकारांनी संगीत, पथनाट्य आणि लोकगीतांच्या माध्यमातून दारू, तंबाखू, गुटखा व अन्य व्यसनांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम प्रभावीपणे नागरिकांसमोर मांडले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, तसेच व्यसनमुक्त आणि आरोग्यसंपन्न राष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर साहेबराव वाघमारे नरंगळकर, शाहीर रमेश गिरी, ढोलकीवादक सुशांत वाघमारे, गायिका सुवर्णा वाघमारे, वंदना खरात, मधुकर लाडंगे, भुजंग बाबळे आदी कलाकारांनी सहभाग घेतला.
