हिंद-दी-चादर:गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




हिंद-दी-चादर गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते.त्यांचे बलिदान आपल्याला सत्य, धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देते. त्यामुळेच त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, गुरू तेग बहादुर साहिबजी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते. त्यांचा पराक्रम, वीरता, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. श्री गुरु नानक देवजींना मानणारा, त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. देशाच्या विपरीत परिस्थितीत श्री गुरु नानक देवजींनी एकत्र बांधणारा, भेदाभेद नष्ट करणारा महान विचार दिला आहे. त्या विचारांनी संपूर्ण देशात विविध समाजांना जोडण्याचे काम केले. हा विचार घेवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे.संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. त्यांची समाधी पंजाबमधील घुमान येथे आहे. संत नामदेवांनी मांडलेले विचार, त्यांचे अभंग आणि पंक्ती यांना श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळाले आहे. त्यांचे विचार गुरुबाणीचा अविभाज्य भाग बनले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वारकरी परंपरा आणि शीख समाज यांच्यातील अनोखे, अतूट नाते अधिक दृढ झाले आहे. श्री गुरु गोविंद सिंघ महाराजांच्या दीर्घकाळ वास्तव्याने नांदेडची भूमी पावन झाली आहे. या भूमीने सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्याचे काम केले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी बलिदान – अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होते. जुलमी शासकांच्या दमनकारी धोरणांविरुद्ध विचार स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले गुरु तेग बहादुरजी यांचे बलिदान हे अभूतपूर्व ऐतिहासिक उदाहरण असून, त्यांच्या निर्भय आचरणातून धार्मिक व नैतिक दृढतेचा आदर्श मिळतो, असे त्यांनी सांगितले. धर्मतत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी देशभर प्रवास करून आध्यात्मिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी रचनात्मक कार्य केले. अंधश्रद्धा व अपप्रथांविरुद्ध त्यांनी प्रबोधन केले, तसेच विहिरी खोदणे, धर्मशाळा उभारणे, दानधर्म व प्राणीसेवा यांसारखी सार्वजनिक कल्याणाची कामे केली, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. सामर्थ्यासोबत सद्भाव जपण्याचा संदेश – पवन कल्याण आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आपल्या भाषणाला मराठी भाषेत सुरुवात करत महाराष्ट्रात पुन्हा येऊन आनंद झाल्याचे सांगितले. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या स्मरणासाठी होणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरेल,असे ते म्हणाले. गुरू तेग बहादूर जी यांच्या जीवनाचा आदर्श घेत युवकांनी देशाला नव्या उंचीवर घेवून जाण्याचा, तसेच देशाला अखंडीत ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासातून सामर्थ्यासोबत सद्भाव जपण्याचा संदेश महाराष्ट्राने दिला आहे, असा उल्लेखही श्री. कल्याण यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *