जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमीच:अजित पवारांच्या निधनावर राज ठाकरेंचा भावूक संदेश; म्हणाले- महाराष्ट्राने उमदा नेता गमावला




महाराष्ट्राच्या राजकारणाला आज एक मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अचानक निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक या घटनेने स्तब्ध झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेवर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवार यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या अकाली निधनावर दु:ख व्यक्त केले. राज ठाकरेंनी लिहिले की, महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावला असून त्यांच्या विचारांनी आणि नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठसा उमटवला होता. राज ठाकरे यांच्या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचा आदर व्यक्त केला असून, त्यांच्या कार्याची आठवण सर्वांच्या मनात कायम राहील असे सांगितले. या भावनिक पोस्टद्वारे त्यांनी संपूर्ण राज्याला आणि राजकीय समुदायाला या दु:खद घटनेची जाणीव करून दिली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी पसरल्याचे जाणवत आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. राज ठाकरे यांची पोस्ट देखील पहा… माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. १९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *