![]()
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यायी इंधनाचा अवलंब करण्यावर भर दिला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाहनचालकांना कठोर उत्सर्जन नियम लागू करण्याचा इशारा दिला. पर्यायी इंधनांचा वापर आता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केल
.
गडकरी म्हणाले, “मी वाहतूक मंत्री आहे, दंडुका घेऊन बसलो आहे.” पर्यायी इंधनाचा वापर न केल्यास युरो ६ सारखे कठोर उत्सर्जन नियम लागू केले जातील, असा दम त्यांनी भरला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे. ट्रॅक्टर कंपन्यांनी १००% इथेनॉल आणि सीएनजीवर चालणारे फ्लेक्स इंजिन ट्रॅक्टर विकसित केले आहेत. भविष्यात, बांधकाम उपकरणांना वित्तपुरवठा करणाऱ्या लोकांनी पर्यायी इंधन आणि जैवइंधन पर्याय निवडल्यास, त्यांना पाच टक्के अनुदान दिले जाईल. या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रचार करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
अलीकडेच तीन ट्रक बाजारात आणले आहेत. यापैकी दोन ट्रकमध्ये डिझेल आणि पेट्रोल इंजिनमध्ये हायड्रोजन मिसळून वापरले जात आहे, तर एक ट्रक पूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालतो. बांधकाम आणि कृषी उपकरणांमध्येही असेच प्रयोग केले जात आहेत.
देशाचे भविष्य पर्यायी इंधन आणि जैवइंधनाशी जोडलेले आहे. येणाऱ्या काळात भारताला प्रगतीपथावर नेणारा हाच मार्ग आहे, असेही गडकरींनी नमूद केले.
