![]()
अमरावतीतील आंबेडकरवादी संघटनांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नाशिक येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाजन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करत, त्यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करण्यात आले. आंबेडकरवादी बहुजन महासंघ या संघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ विधीज्ञ पी. एस. खडसे, माजी नगरसेवक प्रकाश बनसोड, अशांत रंगारी आणि सुनील रामटेके यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. नाशिकमधील घटनेनुसार, मंत्री महाजन यांच्या भाषणादरम्यान त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने, तेथे उपस्थित वन विभागाच्या कर्मचारी माधुरी जाधव आणि दर्शनाताई यांनी सविनय निषेध नोंदवला होता. त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. अमरावतीतील आंबेडकरवाद्यांनी या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. त्यांनी जाधव भगिनींना योग्य पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणीही केली आहे. नाशिकचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करतानाच या भगिनींचे संरक्षण केले जावे, अशी मागणी त्यांनी रेटली. या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे. यावेळी प्राचार्य गोपीचंद मेश्राम, दादासाहेब क्षीरसागर, रमेश रामटेके, हरिदास सिरसाठ, महादेवराव खंडारे, प्रभाकर घोडेस्वार, सचिन तेलमोरे, रामेश्वर रामटेके, संजय घरडे, नामदेवराव वासनिक, रविकांत गवई, प्रवीण वाघमारे, प्रभाकर शेंडे, सिद्धार्थ दामोधरे, अजय रामटेके, ओमप्रकाश बनसोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी:आंबेडकरांचे नाव वगळल्याने अमरावतीतील आंबेडकरवाद्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
