![]()
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या घटनेनंतर अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली आहे. या लाचखोरी प्रकरणात संबंधित मंत्र्यांविरोधात कोणताही ठोस पुरावा समोर आला नसल्याचे स्पष्ट करत, जर पुरावे उपलब्ध असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वतःहून योग्य ती कारवाई करते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अँटी करप्शन ब्युरोला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले आहे. उद्या माझ्याही कार्यालयात असा कोणी व्यवहार केला तरी देखील त्याच्यावर कारवाई होईल. मंत्र्याच्या विरोधात पुरावा असता तर कारवाई झाली असती. कोणतीही कारवाई करण्याआधी एसीबी आधी माहिती घेते. त्यावेळचे संभाषणदेखील रेकॉर्ड केले जाते, त्याच्या नोंदी घेतल्या जातात. आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींमधून मंत्र्यांचे कुठेही नाव आलेले नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लाचखोरीचे प्रकरण उजेडात आल्याने मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ झाली असून, या मुद्द्यावरून सोमवारी अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून, त्यातून सर्व सत्य समोर येईल आणि आपण सभागृहात कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास पूर्णपणे तयार आहोत, अशी स्पष्टोक्ती मंत्री झिरवाळ यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणाचे पडसाद उमटत असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे वादग्रस्त खासगी सचिव रामदास गाडे यांना या विभागातून तातडीने कार्यमुक्त केले आहे. या कारवाईअंतर्गत गाडे यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत म्हणजेच पशुवैद्यकीय विभागात परत पाठवण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले असून, या निर्णयामुळे संबंधित विभागातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
CM देवेंद्र फडणवीसांकडून मंत्री नरहरी झिरवाळांना क्लीन चिट:लाचखोरी प्रकरणात मंत्र्यांचे नाव नाही, फडणवीसांनी दिली माहिती
