अंजली भारतींवर गुन्हा दाखल करा:अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानांवर सचिन धिवार यांची मागणी




महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि लष्कर-ए-भीमा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिवाजीराव धिवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे ही मागणी केली. पोलीस आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. धिवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ जानेवारी रोजी युट्यूब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा उल्लेख करत अमृता फडणवीस यांच्यासंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह, स्त्रीद्वेषी आणि हिंसाचारास प्रोत्साहन देणारी विधाने केली आहेत. ही विधाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नसून ती थेट लैंगिक हिंसाचाराचे समर्थन करणारी असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सचिन धिवार यांनी म्हटले आहे की, अंजली भारती यांनी आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली ही विधाने केली असली तरी, आंबेडकरी विचार महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपणारा आहे. भारती यांची विधाने महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी असून, समाजात द्वेष, भीती आणि अस्थिरता पसरवणारी आहेत. या विधानांमुळे सार्वजनिक नैतिकता, सामाजिक शांतता आणि स्त्री-सन्मान यांचा भंग झाल्याचा दावा धिवार यांनी केला. सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर ही विधाने प्रसारित झाल्याने अनेक महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी इशारा दिला की, या बेताल महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तातडीने कठोर कारवाई न झाल्यास ‘लष्कर-ए-भीमा’च्या महिला ब्रिगेडकडून भारती यांना धडा शिकवण्यात येईल. अंजली भारती यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओचा दुवा तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे. भविष्यात महिलांविरोधात आणि हिंसाचारास प्रवृत्त करणारी विधाने करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, असेही सचिन धिवार यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *