चक्क पोलिस कर्मचाऱ्याकडूनच ड्रग्जची विक्री:जप्त केलेल्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पोलिसला बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई




पुणे पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या अहिल्यानगरच्या एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. हा कर्मचारी जप्त केलेल्या अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याच्या या कृत्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. सध्या या प्रकरणात आणखी काही पोलिसांचा हात आहे का? याचा तपास केला जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, श्यामसुंदर गुजर असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो अहिल्यानगर पोलिस दलात कार्यरत आहे. त्याच्यावर जप्त केलेल्या अमली पदार्थांची मुद्देमाल कक्षातून चोरी करून विक्री केल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांना गत 17 जानेवारीला शिरूर तालुक्यातील शादाब शेख नामक गॅरेज चालक अमली पदार्थांच्या विक्रीसाठी शहरात येणार असल्याची खबर मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले होते. तसेच त्याच्याकडून 1 किलो अमली पदार्थ जप्त केले होते. कसा झाला गुन्ह्याचा उलगडा? शादाब शेखच्या चौकशीत त्याने हे अमली पदार्थ अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड यांच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या असता त्यांच्याकडे उर्वरित 9 किलो 655 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ आढळले. या आरोपींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कसे मिळवले? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानुसार, त्यांनी पुढील तपास केला. त्यात पोलिस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर याने या आरोपींना हे अमली पदार्थ दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी आज श्यामसुंदर गुजर यालाही अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत 10 किलो 707 ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पोलिस कर्मचारी मुद्देमाल कक्षात ठेवलेल्या अमली पदार्थांची चोरी करून त्याची विक्री करत होता. यासाठी त्याने वरील आरोपींची मदत घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणी अमली पदार्थांसह गुन्ह्यात वापरलेली वाहनेही जप्त केली आहेत. अहिल्यानगर पोलिसांनी मे 2025 मध्ये श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेला हा मुद्देमाल होता. श्यामसुंदर गुजरने गत डिसेंबर महिन्यात तो मुद्देमाल कक्षातून चोरला होता. आरोपी पोलिस नेमकी कशी करत होता चोरी? पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ कोर्टाच्या आदेशानुसार सील केले जातात. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ते मुद्देमाल कक्षात ठेवले जातात. श्यामसुंदर गुजर जप्त केलेला मुद्देमाल काढून त्या जागी तशाच दिसणाऱ्या वस्तू ठेवत होता. पोलिसांच्या मते, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश आहे का? याचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *