![]()
हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील रहिवासी असलेले पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशामुळे हिंगोली जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला असून त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी जल्लोष केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांचे प्राथमिक शिक्षण साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर तर माध्यमिक शिक्षण हिंगोली शहरात पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर पोलीस दलात वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलेल्या कुबडे यांनी १९९३ मध्ये पोलिस दलात प्रवेश केला. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी नक्षलग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यांच्या कामाची दखल घेऊन सन २०१८ मध्ये त्यांना पहिल्यांदा गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. विशेषतः तडीपार, मोकोका व स्थानबध्दतेच्या कारवायांमध्ये त्यांची भुमीका महत्वाची ठरली आहे. पोलिस दलातील अतिशय कर्तव्यदक्ष व शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कुबडे यांना दुसऱ्यांचा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल हिंगोलीसह साखरा येथील गावकऱ्यांनी जल्लोष करून त्यांचे अभिनंदन केले आहे. कुबडे यांना मिळाले १२०० पेक्षा अधिक पारितोषीक पोलिस दलात गंभीर गुन्हयांची उकल करणे, गुन्हेगारांना अटक करणे यासह इतर कामगिरी बद्दल त्यांना आतापर्यंत तब्बल १२०० पेक्षा अधिक पारितोषिक मिळाले आहेत. या शिवाय साडेचारशे पेक्षा अधिक प्रशांसापत्र मिळाले आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी ता. २६ त्यांचा पिंपरी चिंचवड येथे सत्कार करण्यात आला.
हिंगोलीचे सुपुत्र सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडेंना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक:जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, साखरा येथे जल्लोष
