'ई-प्रमाण' सेवेचा राज्यभर शुभारंभ:मालमत्ता व विवाह नोंदणीची प्रमाणित कागदपत्रे आता घरबसल्या ऑनलाइन




राज्यातील नागरिकांना नोंदणीसंबंधित सेवा अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने ‘ई-प्रमाण’ या नव्या डिजिटल सेवेचा राज्यव्यापी शुभारंभ केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नोंदणी अभिलेखांचे डिजिटायझेशन आणि नोंदणी व मुद्रांक विभागातील विविध सेवांच्या सुलभीकरणाचाही शुभारंभ करण्यात आला. घरबसल्या मिळणार प्रमाणित कागदपत्रे या उपक्रमामुळे नागरिकांना नोंदणीकृत दस्तऐवज, सूची क्रमांक २ तसेच विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. एसएमएस लिंक किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही कागदपत्रे थेट प्राप्त करता येणार असल्याने शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या कमी होण्यास मदत होणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता वाढणार या डिजिटल प्रतींमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कागदपत्रांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता कमी होणार असून त्यांची विश्वासार्हता आणि सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे. यामुळे कागदविरहित प्रशासनाला चालना मिळण्याबरोबरच शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जुन्या अभिलेखांचेही होणार डिजिटायझेशन नोंदणी व मुद्रांक विभागाकडील सन १८६५ ते २००१ या कालावधीतील जुन्या नोंदणी अभिलेखांचे डिजिटायझेशन करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. पुणे येथील शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालयातील अभिलेखांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार असून नागरिकांना त्यांची प्रमाणित प्रत सहज उपलब्ध होणार आहे. सेवा अधिक सुलभ करण्यावर भर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवांचे पुनर्विलोकन करून अनेक प्रक्रियांमध्ये बदल करण्यात आले आहेत. समान स्वरूपाच्या सेवांचे एकत्रीकरण, अनावश्यक प्रक्रियांचे विलोपन, आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, मंजुरीच्या टप्प्यांमध्ये कपात आणि ऑनलाइन सेवा वितरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागाच्या विविध कामकाजाचा आढावा घेत नागरिकांना अधिक पारदर्शक आणि डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *