
शहरातील रस्ते रुंदीकरणाची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. पाडापाडी झाल्यानंतर आता सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. जळगाव रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तीन अंडरपास करण्याचा पर्याय समोर आला आहे. आंबेडकरनगर, वोक्हार्ट चौक आणि सिडको
.
नारेगाव येथील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मंगळवारी (२२ जुलै) या रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच सेव्हन हिल्स ते सूतगिरणी या ३० मीटर रस्त्यासाठी सोमवारी मनपाच्या पथकाने ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना आवाहन केले. मालमत्ताधारकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. नगररचना विभागाचे ४० आणि नागरी मित्र पथकाचे ५० कर्मचारी असे जवळपास १०० कर्मचारी मार्किंगचे काम करीत आहेत. मार्किंग केल्यानंतर पहिल्या टप्प्यात व्यावसायिक मालमत्ता पाडण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली.
मनपाच्या विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम
शहरातील कोणते रस्ते मोकळे होणार, त्याची रुंदी किती असणार मार्किंग झाल्यानंतर नागरिकांना कागदपत्रे दाखवायचे असतील तर ते कुठे जमा करावे, या रुंदीकरणाबाबत काही शंका असतील तर त्याचे निरसन कुठे होईल याबाबत मनपाकडे स्पष्टता नाही. मनपाच्या नगररचना विभागाने याबाबत नागरिकांमधील संभ्रम दूर करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याचा आरोप होत आहे.
जळगाव, सिल्लोड, फुलंब्री यासह चिकलठाणा एमआयडीसी, जाधववाडी बाजार समिती यासाठी हा रस्ता अगदी महत्त्वाचा आहे. हडको, सिडको या नियोजित वसाहती आहेत. बाजार समिती, सिडको बसस्थानक हा भाग अजून विकसित करण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे. मागील पाच वर्षांत या रस्त्यावरील वाहतूक दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली होती. हा रस्ता मोकळा होणे शहराची गरज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
दिल्ली गेट ते भगवान महावीर चौक रस्ता आता ३५ मीटरचा
दिल्ली गेट ते महावीर चौक रस्ता रुंदीकरणासाठी मार्किंग झाली आहे. आता नव्या डीपीनुसार हा रस्ता ३५ मीटरचा असणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी किमान ७ ते ७.५ फूट रस्ता वाढणार आहे. मात्र यातील अनेक मालमत्ताधारकांनी ३० मी. रस्ता गृहीत धरून बांधकाम केल्याने मालमत्ता रस्ता रुंदीकरणात घ्यायच्या असतील तर त्यांना मोबदला द्यावा लागेल.
सेव्हन हिल्स ते सूतगिरणी ३० मी., सूतगिरणी ते गाडे चौक २४ मीटर
मनपा पथकाने सोमवारी सेव्हन हिल्स ते सूतगिरणी या ३० मी. रुंदीच्या आणि तेथून पुढे सूतगिरणी ते आनंद गाडे चौक, भाजीवाली बाई पुतळ्यापर्यंत २४ मी. या रस्त्यावर मार्किंगसाठी भोंग्याद्वारे नागरिकांना आवाहन केले. या रस्त्यावर बहुतांश मालमत्ता या बांधकाम परवानगी घेऊनच उभारण्यात आल्या आहेत. तसेच गुंठेवारीमध्ये मोडणाऱ्या काही वसाहतींचादेखील समावेश आहे.
१ विमानतळावरून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा या सरकारी कार्यालयात जाणारी सर्व वाहने याच मार्गावरून जातात. २ अजिंठ्याला जाणाऱ्या बहुतांश आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे हा रस्ता मोठा तर पाहिजेच, मात्र याचे रोड फर्निचरदेखील चांगले हवे. ३ या रस्त्यावर प्रमुख सहा चौक आहेत. त्यापैकी तीन चौक हे दोन मुख्य वसाहतींना जोडणारे आहेत. या चौकात पादचाऱ्यांची संख्या अधिक आहे.अंडरपास, भुयारी मार्गाचा पर्याय समोर आला आहे. ४ सध्या हा रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असून ते अतिशय संथगतीने सुरू आहे.