पर्यावरण संवर्धनात सांगळूदकर महाविद्यालय विभागामध्ये प्रथम:राज्यात तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली ही शिक्षण संस्था‎




येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, द्वारा संचालित दर्यापुरच्या जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने अत्यंत प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयाने अमरावती विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक, तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून दुहेरी मानाचा बहुमान प्राप्त केला आहे. हा पुरस्कार २०२४ मध्ये करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक कामासाठी देण्यात आला आहे. या यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. अतुल बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख म्हणाले, महाविद्यालयाच्यावतीन े पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे हे यश आहे. सामाजिक बांधिलकी राखत शाश्वत विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा गौरव असून, या यशामुळे महाविद्यालयाने विभागीय तसेच राज्यस्तरावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तर सत्काराला उत्तर देताना या यशामागे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनाबाबतची सकारात्मक भूमिका हे महत्त्वाचे प्रेरणास्थान ठरल्याचे मत प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी व्यक्त केले. त्यांच्यामते संस्थेच्या भक्कम पाठबळामुळेच महाविद्यालयाला पर्यावरण क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवणे शक्य झाले. शिवाय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकजुटीने केलेल्या परिश्रमांचे हे यशस्वी फलित असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार प्रस्ताव तयार करण्यात प्रा.डॉ.राहुल सावरकर, प्रा.डॉ. हिमांशू जयस्वाल व प्रा.डॉ. राजेश बुरंगे यांनी विशेष योगदान दिले. भविष्यात आणखी जोमाने काम करणार ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ हा सन्मान केवळ पुरस्कार नसून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी अधिक व्यापक, प्रभावी आणि शाश्वत स्वरूपात कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. भविष्यातही वृक्षसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, जलसंधारण आणि पर्यावरण जनजागृतीचे उपक्रम अधिक जोमाने राबवण्याचा संकल्प महाविद्यालयाने व्यक्त केला असून, पर्यावरण रक्षणाची ही चळवळ यापुढेही अविरत सुरू राहील, असा विश्वास प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *