'लोकल अंकल… किमान शर्ट तरी बदलायचा!':सीजेपीच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची अभिजीत दिपकेंकडून पोलखोल



कथित निवडणूक घोटाळ्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, ‘आंदोलनामुळे शांततेचा भंग होतोय आणि आम्हाला त्रास होतोय’ असे सांगत स्थानिक रहिवाशांनी याला विरोध केला असून, या विरोध करणाऱ्या स्थानिकांचे नेतृत्व करणारी व्यक्ती प्रत्यक्षात एक भाजप कार्यकर्ताच असल्याचे उघडकीस आले आहे. ज्यावरून अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ‘लोकल अंकल… किमान शर्ट तरी बदलून घ्यायचा’ अशा शब्दांत या कार्यकर्त्याला जोरदार टोला लगावला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या शिवाजी पार्क येथील ‘जेलभरो’ आंदोलनाला स्थानिक दादरकरांच्या नावाखाली झालेल्या विरोधाला आता नवे वळण लागले आहे. या आंदोलनाला विरोध करणारे प्रकाश बेलवाडे हे सामान्य रहिवासी नसून ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा पक्षाचे नेते अभिजीत दीपके यांनी केला आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ दीपके यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रकाश बेलवाडे यांचा मंत्री आशिष शेलार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत, या तथाकथित स्थानिक रहिवाशांच्या विरोधामागचे सत्य उघड केले आहे. ‘लोकल अंकल, किमान शर्ट तरी बदलून घेतला असता’ मंगळवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या सीजेपी समन्वयकांना ‘स्थानिक दादरकर’ असल्याचा दावा करत काहींनी विरोध केला होता, ज्यामध्ये प्रकाश बेलवाडे आघाडीवर होते. मात्र, अभिजीत दीपके यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे या विरोधामागील राजकीय हेतू उघड झाला आहे. या फोटोत बेलवाडे हे भाजप नेते आशिष शेलार यांच्या मागे बसलेले दिसत असून, दीपके यांनी त्यावर ‘लोकल अंकल, किमान शर्ट तरी बदलून घेतला असता’, अशी खोचक टिप्पणी केली आहे. यावरून, स्थानिकांच्या नावाखाली आंदोलनाला झालेला हा विरोध सामान्य नागरिकांचा नसून तो भाजप कार्यकर्त्यांनी राजकीय हेतूनेच केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवाजी पार्क यांच्या बापाचे आहे का?- संदीप देशपांडे दरम्यान, यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, आंदोलनाला आक्षेप घेणारे हे कोण आहेत? हा प्रश्न सरकारचा आहे. हे कोण रहिवाशी आहेत? की भाजपचे बुरखा पांघरलेले लांडगे आहेत? शिवाजी पार्क काही दोन चार रहिवाशांच्या मालकीचा नाही. या ठिकाणी दोन चार लोक कर भरत नाही. त्यामुळे त्यांच्या आक्षेपाला महत्त्व नाही. शिवाजी पार्क मैदानाला चळवळीचा इतिहास आहे. या मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. याच शिवाजी पार्कने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जवळून पाहिली आहे. अनेक मोठ्या मोठ्या सभा येथे झाल्या आहेत. या विरोध करणाऱ्यांच्या बापाचे शिवाजी पार्क आहे का? असा संतप्त सवाल देशपांडे यांनी केला आहे. पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, शिवाजी पार्क उद्यान मंदिरा संदर्भात तक्रार करणारे हेच लोक आहेत. मग हे कसले हिंदू? देशात मतचोरी झाली आहे. एक भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली आहे. त्याच्या विरोधात लोकांच्या मनात संताप आहे. हा संताप देशभरात आहे. आज आंदोलनाला विरोध करणारे हेच लोक उद्या 6 डिसेंबरलाही विरोध करतील. विरोध करणारे हे स्थानिक नागरिक नव्हते. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अंगावर आलेला घोटाळाव वाचवण्याचे काम ते करत आहेत. भाजपला लॉजिकल गोष्टींना उत्तर देता येत नाही. त्यामुळे ते असा विरोध करत आहेत. त्यांना कितीही विरोध करू दे. जनता रस्त्यावर उतरून त्यांना उत्तर देईल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *