सुनावणी झाली असती तर धक्का बसला असता!:अपेक्षेप्रमाणे तारीख पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार, सुषमा अंधारेंची उपरोधक टीका




शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली. ही सुनावणी परवा म्हणजे शुक्रवारी 23 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती आहे. पण विधिज्ञ असीम सरोदे यांनी ही सुनावणी शुक्रवारी होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा दावा केला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील ट्विट करत म्हटले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या अपेक्षेप्रमाणे तारीख पुढे ढकलल्याबद्दल जाहीर आभार! असे म्हणत उपरोधक टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी मंगळवारी देखील या प्रकरणी ट्विट करत म्हटले होते की, 37 नंबरचे मॅटर कधी बोर्डावरच येणार नाही. आपण भाबडा आशावाद सोडूया आणि ताकदीने लढू या, असे ट्विट त्यांनी केले होते. तसेच आज पुन्हा ट्विट करत त्यांनी या प्रकरणी म्हटले की, आज सुनावणी झाली असती तर मात्र धक्का बसला असता. विधिज्ञ असीम सरोदे यांनी देखील ट्विट करत म्हटले होते की, 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी रिच होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न – जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल, असे त्यांनी ट्विट करत म्हटले होते. दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे आज शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व चिन्हाशी संबंधित वादावर सुनावणी होणार होती. हे प्रकरण कोर्टात 37 व्या क्रमांकावर लिस्टेड होते. त्यावर सकाळच्या सत्रात 11.30 वाजता सुनावणी सुरू होऊन ती सलग 2 दिवस चालणे अपेक्षित होते. पण आज अचानक कोर्टापुढे अरावली पर्वतरांगांचे प्रकरण आले. कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करण्यासाठी दुपारी 1 ची वेळ निश्चित केली. परिणामी, गत 3 वर्षांपासून कोर्टात खितपत पडलेले सत्तासंघर्षाचे प्रकरण असेच पुढे ढकलण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *