पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शकांची चर्चा:नव्या-जुन्या दिग्दर्शकांनी उलगडल्या चित्रपट निर्मितीच्या कथा


पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) मराठी चित्रपट स्पर्धेतील दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या कथा उलगडल्या. काही नवीन तर काही अनुभवी दिग्दर्शक या चर्चेत सहभागी झाले होते. ‘पिफ’चे उपसंचालक विशाल शिंदे यांनी या दिग्दर्शकांशी संवाद साधला. या चर्चेत ‘आदिशेष’चे रमेश मोरे, ‘तो, ती आणि फुजी’चे मोहित टाकळकर, ‘तिघी’च्या जिजीविषा काळे, ‘जीव’चे रवींद्र माणिक जाधव, ‘गोंधळ’चे संतोष डावखर, ‘गमन’चे मनोज नाईक साठम आणि ‘बाप्या’चे समीर तिवारी हे दिग्दर्शक उपस्थित होते. त्यांनी आपापल्या चित्रपटांमागील प्रेरणा आणि निर्मिती प्रक्रिया स्पष्ट केली. ‘तिघी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी सांगितले की, त्यांचा चित्रपट निर्मितीचा प्रवास ‘वजनदार’ या चित्रपटात सहाय्यक म्हणून सुरू झाला. १२ वर्षांनंतर त्यांचा दिग्दर्शक म्हणून चित्रपट प्रदर्शित होत आहे. योग्य सहकाऱ्यांशिवाय कोणतीही गोष्ट पुढे जात नाही, असे त्या म्हणाल्या. एकुलती एक असल्याने आलेले एकटेपण आणि आयुष्यात पाहिलेल्या स्त्रिया त्यांच्या चित्रपटाची प्रेरणा ठरल्या. ‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी पूर्वीपासून नाटक करत असल्याचे सांगितले. शहरात वाढल्यामुळे शहरी जीवनातील कोलाहल आणि नात्यांमधील बदल हे त्यांच्या चित्रपटाचे मुख्य विषय आहेत. शहरी जीवनातील अनेक प्रश्न त्यांच्या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘जीव’चे दिग्दर्शक रवींद्र माणिक जाधव यांनी धुळ्यात शिक्षक म्हणून काम करत असताना चित्रपट निर्मितीचा विचार मनात आल्याचे सांगितले. २०१३ मध्ये त्यांनी पहिला माहितीपट तयार केला. ‘शाळाबाह्य’ आणि ‘निरोध’ यांसारखे माहितीपट हॅंडीकॅमवर बनवले. ‘थाळ भांकसर’ या माहितीपटासाठी त्यांना २ लाखांचे बक्षीस मिळाले, ज्यामुळे त्यांना पुढील काम करण्याची प्रेरणा मिळाली. २०१८ मध्ये एका व्यक्तीने सांगितलेल्या नागपंचमीच्या आठवणीतून ‘जीव’ चित्रपटाची कथा पुढे आली आणि पत्नीच्या आर्थिक पाठिंब्यामुळे चित्रपट पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले. ‘गमन’चे दिग्दर्शक मनोज नाईक साटम म्हणाले, “मी फोटोग्राफर होतो. लग्नाचे फोटो काढायचो. तेंव्हा व्हिडिओ शुटिंग पाहत पुढे आलो आणि त्यातून चित्रपट तयार करण्याचा विचार करत होतो. लहानपणापासून अनेक चित्रपटांची दृश्य मनात ठसली. एक कथा डोक्यात होती, ती लिहिली त्याची पुढे कादंबरी झाली. ती २०१५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि उमेद आली. त्याचाच पुढे चित्रपट झाला. हा चित्रपट करताना अर्थातच पैसे नव्हते. हातात होते ते सगळे पणाला लावले. केवळ वेडे होणे किंवा डुबणे, असे दोन पर्याय होते. मी डुबायचे ठरवले. कोकणातूनच पात्रं पुढे आली आणि चित्रपट पूर्ण झाला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *