![]()
भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करत बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पूर्वी देखील नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हिंदू शेरणी आणि निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथील भाषणानंतर नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याने अमरावती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धमकी प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अमरावतीमध्ये भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. परंतु, या निवडणुकीत एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका चांगलीच चर्चेत आली. मुले जन्माला घालण्याच्या संदर्भात नवनीत राणा यांनी वक्तव्य केले होते. तोच मुद्दा पकडत ओवेसी यांनी नवनीत राणा यांना डिवचले होते. त्यानंतर, आता पोलिसांना फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, यापूर्वी हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या एका व्यक्तीने घाणेरड्या शब्दांत नवनीत राणा यांना पत्रातून धमकी दिली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात त्यांना धमकीचे दुसरे पत्र आले होते. तेव्हा देखील नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यकाच्या फिर्यादिवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू:नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
