माहुली चोर येथे श्रमदानातून वनराई बंधारा उभारला:भूजल पातळी वाढणार, प्राणी-पशुपक्ष्यांनाही मिळणार पाणी




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ‘ग्राम समृद्ध अभियान’ अंतर्गत वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पात्रात हा बंधारा बांधण्यात आला असून, यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, जंगलातील प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. ग्रामविकास विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमातून जिल्हा परिषद प्रशासनाने माहुली चोरसह इतर गावांमध्येही वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावांमध्ये असे बंधारे बांधले जात आहेत, ज्यामुळे तालुक्यातील पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. माहुली चोर येथील वनराई बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले. त्यांच्या सहभागामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य झाले आहे. सध्या इतर गावांमध्येही वनराई बंधाऱ्यांचे काम सुरू असून, शासनाचा जलसंधारणाचा उद्देश मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. या बंधाऱ्यांमध्ये अडलेल्या पाण्याचा उपयोग जंगलातील प्राणी, पशुपक्ष्यांना पिण्यासाठी होतो. याशिवाय, शेतकरी शेतीसाठी संरक्षित पाणी म्हणून त्याचा वापर करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. या जलसंवर्धनाच्या कामात गावातील अनेक नागरिकांनी श्रमदान केले. यात सरपंच संगीता झंझाड, उपसरपंच राजेंद्र सरोदे, सदस्य सुधा जाधव, विभा ढगे, रोशन पवार, अरविंद गाडेकर, ग्रामपंचायत अधिकारी अरुण रायबोले, सहाय्यक कृषी अधिकारी पंकज लाडके, बंडू जाधव, शुभांगी नाळे, कांचन नाळे, दिनेश खंडारे, प्रवीण जाधव, कोतवाल मनीषा लोहकरे, रोहित क्षीरसागर, रोजगार सेवक गजानन गाडेकर, मोतीराम गोतमारे, महादेव गादे, प्रणव सरोदे, समर्थ नाळे, किसन डुकरे, वैशाली गाडेकर, अनिता झंझाड आणि इतर युवकांचा सहभाग होता. वनराई बंधाऱ्याची निर्मिती ‘वेस्ट टू बेस्ट’ या संकल्पनेवर आधारित आहे. यात वापरात नसलेल्या स्थानिक संसाधनांचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये नदी किंवा नाल्यातील रेती भरून त्यांचे एकावर एक थर पाण्याच्या प्रवाहाच्या आडवे रचले जातात. सिमेंटच्या घट्ट कापडी पिशव्यांमधून पाणी वाहून जात नाही, ज्यामुळे पाणी अडवले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *