वसई-विरारमध्ये 'बविआ'ची एकहाती सत्ता:भाजपचा दारुण पराभव; मिलिंद नार्वेकरांनी घेतली ठाकूर बंधूंची भेट




वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव करत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर आणि भाई ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये ठाकूर यांच्या पक्षाने बाजी मारली. या यशानंतर नार्वेकरांनी ठाकूर यांच्या राजकीय कामगिरीचे विशेष कौतुक केले असून, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत महापालिकेवर आपला झेंडा फडकवला. एकूण 115 जागांपैकी 71 जागांवर दणदणीत विजय मिळवत बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत प्राप्त केले, तर भाजपला 43 जागांवर समाधान मानावे लागले. ठाकूर यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपला रोखत मिळवलेल्या या यशाची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. या ऐतिहासिक विजयानंतर ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. नार्वेकर यांनी केवळ ठाकूर यांचेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांचे आणि बहुजन विकास आघाडीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचेही विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत भाजपविरुद्ध थेट संघर्ष केल्यानंतर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे आता नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. वसई-विरारमध्ये बविआची एकहाती सत्ता वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) आपले वर्चस्व कायम राखत 115 पैकी 71 जागांवर दणदणीत विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 43 जागांवर यश मिळाले, तर शिवसेना शिंदे गट केवळ एका जागेवर विजय मिळवू शकली आहे. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्ष उमेदवाराला या महापालिकेत आपले खाते उघडता आले नाही, ज्यामुळे वसई-विरारमध्ये पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील ‘बविआ’ची एकहाती सत्ता आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *