जि.प. पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थान, दालनांच्या दुरुस्तीसाठी ६० लाखांची तरतूद:नव्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज




आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता, अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये, तर मुख्यालयातील दालनांच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मार्च २०२२ मध्ये तत्कालीन पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपल्यापासून सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राजवट सुरू आहे. निवडणुका कधी होतील, हे अनिश्चित असल्याने गेल्या तीन वर्षांपासून पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थाने आणि दालनांच्या दुरुस्तीसाठीची वार्षिक तरतूद पुढे ढकलली जात होती. आता निवडणुका अपेक्षित असल्याने जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीमधील निवासस्थाने आणि मुख्यालयातील दालनांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती असे एकूण सहा पदाधिकारी असतात. अध्यक्षांकडे आमसभा, स्थायी समिती आणि जल व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद असते, तर उपाध्यक्षांकडे दोन समित्यांचे सभापतीपद असते. याशिवाय महिला व बालविकास आणि समाजकल्याण समितीसाठी स्वतंत्र सभापती असतात, तर शिक्षण, आरोग्य, वित्त व बांधकाम यापैकी प्रत्येकी दोन खाती अन्य दोन सभापतींकडे दिली जातात. या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी शासनातर्फे निवासस्थाने आणि कार्यालये उपलब्ध करून दिली जातात, ज्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही शासनाची असते. पदाधिकाऱ्यांना जिल्हाभर प्रवासासाठी सरकारी किंवा खासगी वाहन वापरण्याची मुभा असते. खासगी वाहन वापरल्यास जिल्हा परिषद प्रशासनातर्फे इंधन भत्ता दिला जातो. मात्र, हा भत्ता पुरेसा नसल्याने बहुतांश पदाधिकारी सरकारी वाहनांचीच मागणी करतात. त्यामुळे या वाहनांसाठी लागणारे इंधन आणि चालकाची सोय देखील प्रशासनातर्फेच केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *