पालांदूर जि.प. शाळेत 93 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक:संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाचा निषेध केला




भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर (चौ.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ९३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. या परिस्थितीमुळे संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी मंगळवारी, १४ जुलै रोजी शाळेच्या मुख्य गेटला कुलूप ठोकून शिक्षण विभागाचा निषेध केला. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळेत एकूण ९३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पहिलीत २०, दुसरी २५, तिसरी २६ आणि चौथी २२ विद्यार्थी आहेत. एकाच शिक्षकाला चार वर्ग सांभाळणे अवघड होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. एका वर्गात शिक्षक शिकवत असताना इतर तीन वर्गांतील विद्यार्थी लक्षविहीन राहतात. या शैक्षणिक दुरवस्थेमुळे दोन पालकांनी सोमवारी आपल्या पाल्यांचे शाळेतून दाखले काढून घेतले, ज्यामुळे पालकांमधील नाराजी वाढली. शाळेची ही स्थिती पाहून उपसरपंच पंकज रामटेक यांच्या नेतृत्वाखाली गावकरी, महिला आणि पुरुषांनी मंगळवारी सकाळी एकत्र येत शाळेच्या मुख्य गेटला कुलूप लावले. शासनाच्या आणि शिक्षण विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करत, कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही केली. प्रशासनाने ५००० रुपये प्रतिमहा मानधनावर दोन महिला स्वयंसेविकांची तात्पुरती नियुक्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *