प्रगतिशील शेतकरी:झिगझॅग लागवडीतून अवघ्या 1 एकरात डाळिंबातून 42 लाख उत्पन्न, सांगोला तालुक्यातील अजनाळेच्या शेतकऱ्याचा प्रयोग




द्राक्षबागेतील मोठ्या नुकसानीनंतर खचून न जाता सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील प्रयोगशील शेतकरी साधू किसन कोळवले यांनी डाळिंब लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. क्रॉस (झिगझॅग) पद्धतीने अवघ्या एका एकरात १,००० झाडांची लागवड करत त्यांनी १८.५ ते २० टनांपर्यंत उत्पादन घेतले. बाजारात प्रति किलो २०० ते २११ रुपये दर मिळाल्याने त्यांना सुमारे ४२ लाखांचे उत्पन्न मिळाले. कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेत कोळवले यांनी क्रॉस लागवड पद्धती स्वीकारली. या पद्धतीमुळे कमी जागेत अधिक झाडे बसविणे शक्य झाले. योग्य नियोजन, वेळेवर व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण निगा यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. पहिल्याच हंगामात प्रत्येक झाडापासून सरासरी १८.५ ते २० किलो उत्पादन मिळाले. त्यांच्या यशामागे घरगुती निविष्ठा व्यवस्थापनाचा मोठा वाटा आहे. एका ॲग्रो तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घरीच सेंद्रिय खते व औषधे तयार केली. रासायनिक व सेंद्रिय स्लरीचा संतुलित वापर केल्याने बाजारातील महागडी तसेच भेसळयुक्त खते खरेदी करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे पाच लाख रुपयांवर नियंत्रणात राहिला. दरम्यान, क्रॉस (झिगझॅग) पद्धतीत कमी क्षेत्रात अधिक झाडांची लागवड करता येते. झाडांमधील योग्य अंतरामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवेचा मुक्त प्रवाह मिळतो. त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी राहून झाडांची वाढ अधिक जोमदार होते. झाडे रुंदावल्यानंतरही मशागत, फवारणी, खत व्यवस्थापन आणि तोडणीची कामे सुलभपणे करता येतात. योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते आणि कमी क्षेत्रातून अधिक आर्थिक परतावा मिळवणे शक्य होते. याबाबत बोलताना साधू कोळवले म्हणाले की, द्राक्षाच्या नुकसानीनंतर डाळिंबाचा हा प्रयोग आमच्यासाठी दिशादर्शक ठरला. घरच्या घरी तयार केलेल्या खतांमुळे खर्च ५ लाखांवर मर्यादित राहिला आणि भेसळयुक्त खतांचा धोका टळला. झिगझॅग पद्धतीने डाळिंबाची लागवड केल्याने प्रत्येक झाडाला औषधांची मात्रा तंतोतंत बसली आणि डाळिंबाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट राहिला व दरही चांगला मिळाल्याचे समाधान आहे. असे आहे खर्च-उत्पन्नाचे गणित कोळवले यांनी एका एकरात १,००० झाडे लावली. त्यातून १८.५ ते २० टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले. बाजारात प्रतिकिलो २०० ते २११ दर मिळाला. तर ५ लाखांचा खर्च आला. या सर्व गणितातून साधू कोळवले यांनी सुमारे ४२ लाखांचे उत्पन्न मिळवत आधुनिक शेती फायदेशीर ठरू शकते, हे सिद्ध करून दाखवले. प्रगतिशील शेतकरी मोबाइल नंबर : 9890218907

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *