The next mayor of Pune will be from the NCP. | पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल: सुप्रिया सुळे यांचा विश्वास; भाजपवर टीका – Pune News



राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकशाहीत काहीही निश्चित नसते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.

.

सुळे यांनी ‘ओरिजिनल भाजप’ आणि ‘भाजप २.०’ मध्ये फरक असल्याचे म्हटले. दिवंगत गिरीश बापट आणि प्रकाश जावडेकर यांच्यासारखा सुसंस्कृतपणा आताच्या भाजपमध्ये उरला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भाजप केवळ ‘विनेबिलिटी’ आणि सत्तेसाठी मूल्यांशी तडजोड करत असून, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच पक्षात घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी लाल महाल येथून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

सुळे यांनी पुणेकरांना दिलेल्या मोफत बस आणि मेट्रो प्रवासाच्या आश्वासनावरही भाष्य केले. हे आश्वासन केवळ निवडणुकीपुरते नसून, तज्ज्ञांच्या अभ्यासातून मांडलेला ‘शब्द’ असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन ‘अशक्य’ असल्याचे म्हटल्यानंतर, सुळे यांनी भाजपच्या १५ लाख रुपयांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली.

त्या म्हणाल्या, ‘आमचा अनुभव आणि काम वेगळे आहे, आम्ही दिलेले शब्द पाळतो.’ तसेच, त्यांनी भाजपच्या ‘४०० पार’च्या घोषणेचे काय झाले, असा सवाल करत टोला लगावला.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुण्यात ‘कोयता गँग’ची दहशत आणि गुन्हेगारीचा वाढलेला आलेख हा भारत सरकारचाच डेटा सांगत असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी यावर आत्मचिंतन करावे आणि पुण्यातील सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

केवळ ‘काम बोलतं’ असे म्हणून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कौटुंबिक वादांपेक्षा राज्यापुढील आर्थिक आणि जागतिक आव्हाने अधिक महत्त्वाची असल्याचे सुळे यांनी नमूद केले. निर्यात धोरण, अमेरिका-चीन संबंधांमधील तणाव आणि वाढलेला टॅरिफ यांचा परिणाम पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यावर आणि औद्योगिक क्षेत्रावर होत आहे, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या काळात विकसित झालेली हिंजवडी, तळेगाव आणि चाकण सारखी औद्योगिक क्षेत्रे वाचवणे हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या विलंबाबाबत त्यांनी सरकारला कोर्टाच्या निकालाचा संदर्भ देत लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर बोलताना, त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा दाखला दिला. ‘जो महाराष्ट्रात आणि मुंबईत राहतो, तो प्रत्येक जण मराठी आहे,’ असे सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *