![]()
अमरावती ते दर्यापूर राष्ट्रीय मार्गावरील खोलापूर बस थांब्यावर एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकृत थांब्याऐवजी बसेस सुमारे ३०० मीटर अंतरावर थांबत असल्याने पासधारक विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना पायपीट करावी लागते.
.
खोलापूर येथून परिसरातील नावेद, वाठोडा शुक्लेश्वर, हरताळा, खालकोणी, हातोटी, बोरखडी, काकरखेडा यांसारख्या अनेक गावांतील विद्यार्थी, कर्मचारी आणि रोजंदारीवर काम करणारे युवक अमरावती आणि दर्यापूर येथे ये-जा करतात. सकाळी ९ ते ११ या वेळेत या थांब्यावर मोठी गर्दी असते. एसटी महामंडळाच्या नोंदीनुसार, खोलापूर हा लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी एक महत्त्वाचा थांबा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सुमारे तीनशे विद्यार्थी अमरावतीला शिक्षणासाठी जातात. या विद्यार्थ्यांनी एसटीचे पास काढले असले तरी, त्यांना योग्य ठिकाणाहून बसमध्ये चढता येत नाही. यामुळे त्यांना नाहक धावपळ करावी लागते आणि मोठा त्रास सहन करावा लागतो.
हा त्रास थांबवण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक वेळा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. मात्र, एसटी चालकांच्या थांबण्याच्या पद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ येत असल्याने, महामंडळाने या निवेदनाची दखल घेऊन बसेस अधिकृत थांब्यावरच थांबवाव्यात, अशी पालकांची मागणी आहे.
