Students started a ‘Money Bank’ by saving the money they received for food, Mahanor Wasti ZP Primary School welcomed the New Year in a special way | खाऊसाठी मिळणारे पैसे साठवून विद्यार्थ्यांनी सुरू केली ‘मनी बँक’: महानोर वस्ती झेडपी प्राथमिक शाळेत नवीन वर्षाचे आगळेवेगळे स्वागत‎ – Ahilyanagar News



नेवासे तालुक्यातील महानोर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रमाने केले आहे. रोज खाऊसाठी मिळणारे पैसे खर्च न करता ते साठवून ‘मनी बँक’ सुरू करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला

.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व, आर्थिक शिस्त आणि भविष्यकालीन नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याच कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वतःहून खाऊचे पैसे साठवून मनी बँक सुरू करण्याचा संकल्प जाहीर केला. प्रत्येक विद्यार्थ्याने छोट्या रकमेपासून बचत सुरू केली आहे. जमा होणारी रक्कम शैक्षणिक गरजा, गरजू विद्यार्थ्यांची मदत तसेच उपयुक्त शालेय उपक्रमांसाठी वापरण्याचा मानस व्यक्त केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय, जबाबदारीची भावना व एकोप्याचे महत्त्व रुजत आहे. पालकांनी व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या या सकारात्मक विचारांचे अभिनंदन केले. शाळेतील शिक्षिका ज्योत्स्ना साळुंके व शिक्षक चंद्रकांत पालवे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत या उपक्रमास प्रोत्साहन दिले.

लहान वयातच आर्थिक साक्षरतेचा धडा देणारा ‘मनी बँक’ हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरेल, नवीन वर्षाची सुरुवात समाजहिताच्या संकल्पाने करण्याचे उत्तम उदाहरण जि. प. प्रा. शाळा महानोर वस्तीच्या विद्यार्थ्यांनी घालून दिले आहे, असे मुख्याध्यापिका ज्योत्स्ना साळुंके म्हणाल्या. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेला संकल्प अनोखा असून या उपक्रमाचे विद्यालयातील शिक्षक आणि गावातील नागरिकांनीही कौतुक केले आहे. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याने छोट्या रकमेपासून पैसे साठवायला सुरुवात केली आहे. जमा होणारी रक्कम शालेय उपक्रमांसाठी वापरणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *